उत्तरपत्रिका तपासणीला शिक्षकांचा विरोध
By admin | Published: March 11, 2017 12:32 AM2017-03-11T00:32:18+5:302017-03-11T00:32:18+5:30
बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यात असहकार करण्याचा निर्धार विजुक्टा संघटनेने केला आहे.
बारावीच्या निकालावर पडणार परिणाम : विजुक्टा शिक्षक संघटनेचा निर्णय
कोंढा (कोसरा) : बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यात असहकार करण्याचा निर्धार विजुक्टा संघटनेने केला आहे. त्यामुळे या असहकार आंदोलनाचे पडसाद मॉडरेटरच्या नागपूर येथील सभेत होत आहेत.
कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात भंडारा जिल्ह्यात असहकार राहणार असे जिल्हा विजुक्टाचे प्रा. मार्तंड गायधने व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धरीजकुमार, शिक्षण संचालक पुणे, संचालक बालभारती, राज्य बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपसचिव महाराष्ट्र शासन तसेच महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल विजुक्टा अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, महासंघाचे उपाध्यक्ष तळेकर यांच्या उपस्थितीत शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नावर बैठक झाली. २ मे २०१२ ते १९ जुलै २०१४ चे दरम्यान निकष प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या नियुक्त शिक्षकांना मान्यता देण्याचे मान्य करणे, २० टक्के अनुदानासाठी लावलेल्या ३५ अटीच्या पुर्ततेअभावी वेतन अनुदानापासून अनेक शिक्षक वंचित होतील त्या दूर करणे, मान्य पदापेक्षा पदभरती कमी असल्याची सबब इतर शिक्षकांवर अन्यायकारक आहे ती रद्द अनुकुलता, शिक्षण सेवकांची सेवा झाल्यावर वेतनश्रेणीत मान्यता त्वरीत द्यावी, आदी मागण्या आहे. (वार्ताहर)