तुमसरातील विकास कामांमुळे विरोधकांचा बदनामीचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:42 AM2021-09-04T04:42:23+5:302021-09-04T04:42:23+5:30
विद्यमान नगरपालिकेच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी माझ्या कार्यकाळातील झालेल्या कामासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले ...
विद्यमान नगरपालिकेच्या कार्यकाळाचे शेवटचे वर्ष आहे. त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी माझ्या कार्यकाळातील झालेल्या कामासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले आहे. सफाई कामगार हे नगरपरिषद कर्मचारी नाहीत. त्यांच्या पगार किंवा देयकांशी नगरपरिषदेचा कोणताही संबंध नाही. सफाई कर्मचाऱ्यांना वेतन नगरपरिषदेमुळे मिळाले नाही असा गवगवा करण्यात आला.
गांधी सागर तलाव हा शासनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्याचे आदेश आहेत. हा तलाव शासनाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात येणार आहे. या तलावाचे सौंदर्यीकरण करून येथे विजेचे दिवे व हायमास्ट लावण्यात येणार आहे. गांधी सागर तलाव व उद्यानासाठी पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. येथे सध्या स्वच्छता करण्यात आली आहे. खेळांचे साहित्य येत्या एक ते दीड महिन्यात लावून खुला करण्यात येणार आहे.
नेहरू शाळेच्या पटांगणावर आमदार राजू कारेमोरे, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रादुर्भावावर घालण्यासाठी गर्दी होऊ नये, याकरिता भाजीबाजार स्थलांतरित करण्यात आला. परंतु तेथे राजकारण करून कामात अडथळा घालण्यात येत आहे.
तुमसर पालिकेची प्रशासकीय इमारत ही ३ कोटी ४८ लाखांचे असून त्यापैकी १ कोटी ३९ लाखांचे आतापर्यंत कामे झाली आहेत. या इमारतीचे काम प्रगतिपथावर असून लवकरच काम पूर्ण होणार आहे. येथेही राजकीय सूडबुद्धीने आरोप करण्यात येत आहे. नेहरू विद्यालय, बांगडकर शाळा, मालविय शाळेला डिजिटल करण्यात आले. तसेच रामजी गणेशा शाळेच्या बांधकामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून ९७ लाखांचा निधी येथे खर्च करण्यात येणार आहे. शहरात पंधरा ते वीस कोटींची कामे प्रस्तावित आहेत. तीन महिन्यात नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना ही ४७ कोटींची आहे त्यामुळे शहराचे पाणीटंचाई दूर होणार आहे. पत्रकार परिषदेला नगरसेवक रजनीश लांजेवार, प्रमोद घरडे, मेहताबसिंग ठाकूर, कैलास पडोळे, पंकज बालपांडे, सचिन बोपचे, किरण जोशी आदी उपस्थित होते.