महिलेवर अत्याचार; सात वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:40 AM2018-08-24T00:40:15+5:302018-08-24T00:42:50+5:30
शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तीन वर्षापूर्वी पवनी तालुक्याच्या चिखली येथे एका शेतात महिलेवर अत्याचार करण्यात आला होता.
प्रमोद अरविंद गजभिये (३८) रा.साठगाव ता.चिमूर जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. सदर पीडित महिला चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव येथील असून ती पवनी पोलीस ठाण्यांतर्गत चिखली येथील बाळू रामचंद्र फुलबांधे यांच्या शेतातील घराच्या बांधकामासाठी आली होती. त्याच गावातील प्रमोद गजभियेही दहा दिवसांपासून मजुरीवर येत होता. १३ जून २०१५ रोजी मजूर कामावर आले. सायंकाळी घरमालक फुलबांधे निघून गेले. सहकारी महिला ही निघून गेल्या. त्याठिकाणी पीडित महिला आणि प्रमोद गजभिये दोघेच उपस्थित होते. त्याठिकाणी कुणी नसल्याचे पाहून सदर महिलेवर बळजबरीने एका खोलीत नेवून अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आपले गाव गाठले. चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु घटनेचे ठिकाण भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पोलिसांनी प्रकरण पवनी ठाण्याकडे वर्ग केले. आरोपी प्रमोद गजभिये विरुद्ध भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर बोरकुटे यांनी करून आरोपी प्रमोदला साठगाव येथून अटक केली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यात साक्ष पुरावा गोळा केले. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.सी. पांडे यांच्या न्यायालयात करण्यात आली.
सरकारी अभियोक्ता अॅड.विश्वास तवले यांनी न्यायालयात योग्य बाजू मांडून साक्षीदार तपासले. गुन्ह्याचे स्वरुप व गंभीरता लक्षात घेऊन गुरुवारी न्यायालयाने प्रमोद गजभिये याला सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक चकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार चंद्रशेखर पटले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.