तुमसरच्या गणेश भवन इमारतीवर हातोडा मारण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:41 AM2021-09-24T04:41:50+5:302021-09-24T04:41:50+5:30
तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील ...
तुमसर येथील बोसनगरात गणेश भवन इमारत असून या इमारतीत गत ३५ ते ४० वर्षांपासून ११ दुकाने असून, तुमसर येथील नामवंत जनता कनिष्ठ महाविद्यालय भरत आहे. इमारत मालकाने जीर्ण इमारत असल्याचे सांगून दुकानदार व शाळा प्रशासनाला बाहेर काढण्याकरिता कट कारस्थान रचले आहे. वास्तविक ही इमारत मालकाने बिल्डरांना विक्री केली आहे. इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येते. नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट हा शासनमान्य स्वतंत्र एजन्सीद्वारे करण्यात यावा, असे निर्देश आहेत. परंतु त्यांनी उद्देशाला येथे डावलण्यात आले आहे. यासंदर्भात यापूर्वी तहसीलदार यांनी ११ दुकानदार व शाळा प्रशासनाची सुनावणी घेतली होती. या सुनावणीत दुकानदार व शाळा प्रशासनाने सविस्तर माहिती दिली. परंतु त्या उपरांतही उपविभागीय अधिकाऱ्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन हेतुपुरस्सर कारवाई केली. गणेश भवन इमारतीमधील ११ दुकानदारांनी न्यायालयात धाव घेतली. त्यापैकी एका दुकानदाराला संपूर्ण गणेश भवन इमारतीचा न्यायालयाने "स्टे" दिला आहे.
बॉक्स
शिवसेना, विद्यार्थी व ११ दुकानदार आंदोलन करणार
उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर यांनी दिलेला आदेश हा अन्याय करणारा असून, केवळ २० तासांत दुकाने व शाळा कशी कमी करावी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असून शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ३५९ इतकी आहे. शाळा भुईसपाट केल्यास विद्यार्थ्यांचे वर्ग कुठे भरतील असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीकडे उपविभागीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. गणेश भवन इमारत भुईसपाट केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना, आजी-माजी विद्यार्थी व दुकानदारांनी दिला आहे.
कोट
शाळेची इमारत ही मजबूत असून इमारत मालकाने बिल्डरांना विक्री केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून नियमबाह्यपणे येथे कारवाई केली जात आहे. याचा शिवसेना तीव्र निषेध करीत असून शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल.
अमित मेश्राम, शिवसेना विभागप्रमुख, तुमसर.
कोट
गणेश भवन इमारत भुईसपाट करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे निर्णय घेतला. केवळ वीस तासांत दुकाने कशी कमी करावी, आमचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी आम्हाला भेट देण्याची गरज होती. या निर्णयाचा आम्ही निषेध करीत असून संपूर्ण कुटुंबासमवेत आंदोलन करण्यात येईल.
डॉ. चंद्रशेखर भोयर, अध्यक्ष, गणेश भवन बचाव संघर्ष समिती, तुमसर