तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 22, 2017 12:23 AM2017-06-22T00:23:43+5:302017-06-22T00:23:43+5:30
जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले.
उपायुक्तांचे आदेश धडकले : चौकशी समिती आज करणार विशेष तपासणी
प्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले. जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागातील कामांची विशेष तपासणी आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. यासंबंधीचे आदेश उपायुक्त (आस्थापना) कमलकिशोर फुटाणे यांनी बजावले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या स्थानांतरणानंतर शरद अहिरे हे २३ आॅगस्ट २०१६ ला भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले. ते २ मे २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अधिनस्थ सर्व विभागात जी कामे केली त्या सर्व विभागातील कामांची विशेष तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय विकास शाखा (आस्थापना) चे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी २१ जूनला बजावले. या आदेशाची माहिती अत्यंत गोपणीय ठेवण्यात आली आहे. तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या काळातील या विशेष तपासणीला गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बुधवारला तातडीचे पत्र पाठविले आहे. पत्र प्राप्त होताच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालिची अस्वस्थता पसरली आहे.
शरद अहिरे यांचा कार्यकाळ बहुतांशी वादग्रस्त ठरला. चुकीचे निर्णय घेतल्याचा विरोधकांचा त्यांच्यावर आरोप होता. काही निर्णय थांबविल्याने अनेक प्रकरणे रखडल्याची बाब समोर आल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये आहे. सदर विशेष तपासणी पथकाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाला आवश्यक दस्ताऐवजासह योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शरद अहिरे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची विशेष तपासणी होत असल्याने यात मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी हे रजेवर असल्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरीता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.