सीतासावंगी येथील वाघाला जेरबंद करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:01 AM2017-12-21T00:01:10+5:302017-12-21T00:01:16+5:30
आॅनलाईन लोकमत
तुमसर : मंगळवारी रात्री चिखला गाव शिवारात दोन वाघ दिसल्याने पुन्हा खळबळ उडाली होती. गावाशेजारी फिरणाऱ्या या वाघाला जेरबंद करण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे. दरम्यान, या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे निर्देश नागपूर येथील मुख्य उपवनसंरक्षकांनी दिले आहे.
तुमसर तालुक्यातील सीतासावंगी, चिखला, चुलुरडोह, पवनारखारी, सुंदरटोला, धनेगाव, खैरटोला गावाशेजारी वाघाचे दर्शन झाले. सीतासावंगी येथील वाघ हा नर असून या जंगलातील एका मादीने चिखला येथे रात्री दर्शन दिले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री येथे दाखल झाले होते. मंगळवारी सीतासावंगी येथील वाघाला चिखला जंगलात हाकलून लावण्यात आले, पुन्हा तो वाघ दिसल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनसंरक्षकांच्या निर्देशानंतर वनअधिकारी शॉर्पशुटरसोबत जंगलात शोधमोहीम राबवित आहेत. दरम्यान वनविभागाने सीतासावंगी शिवारातील झुडपी जंगल यंत्राच्या सहाय्याने कापण्यात आले असून वनविभागाचे पथक गावात सज्ज आहे.
सीतासावंगी येथील वाघाला जेरबंद करण्याची परवानगी उपवनसंरक्षकांनी दिली आहे. त्याकरिता शोधमोहिम सुरु आहे. लवकरच या वाघाला जेरबंद करण्यात येईल.
- अरविंद जोशी,
वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.
सीतासावंगी शिवारातील वाघ हा आजारी असल्याने तो मानवी वस्तीत प्रवेश करीत आहे. त्याला जेरबंद करुन उपचार करण्याची गरज आहे. एरव्ही वाघ माणसांची गर्दी पाहून दूर पळतो. हा वाघ उलट जवळ येत आहे. आजारी वाघाला एकावेळेस भूक लागत नाही. त्यामुळे लहान प्राण्यांचा शोधार्थ गावात शिरत आहे.
- राजकमल जोब,
वन्यप्रेमी तथा प्राणीप्रेमी.