उस्मानाबादच्या भामट्याने भंडाऱ्यातील बेरोजगारांना कोट्यवधींनी गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:18 PM2018-08-03T12:18:26+5:302018-08-03T12:21:25+5:30
महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. येथील जिल्हाकचेरी परिसरात कार्यालय थाटणारा हा भामटा महिनाभरापूर्वी पसार झाला आहे. भंडारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून उल्लेखनीय म्हणजे मंत्रालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे नावही या प्रकरणात गोवले जात आहे.
विजय राजेंद्र रणसिंग (२८) रा. उस्मानाबाद असे या भामट्याचे नाव आहे. काही महिन्यापूर्वी तो भंडारा येथे दाखल झाला. महिला व बालविकास विभागाचा उपसचिव असल्याचे तो सांगायचा. लवकरच त्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या एका इमारतीत परवानगी घेवून आपले कार्यालय सुरु केले होते. कार्यालयात तो राजमुद्रा असलेल्या स्वत:च्या वाहनाने यायचा. बेरोजगार तरुण-तरुणींना कार्यालयात बोलावून त्यांची कागदपत्रे मागायचा. त्याचा रुबाब आणि शासकीय परिसरात असलेले कार्यालय पाहून कुणाचाही त्याच्यावर सहज विश्वास बसायचा. एकदा विश्वास संपादन केला की, तो समोरच्याला नोकरीचे आमिष द्यायचा.
ठराविक रक्कम घेऊन नागपूरच्या हैद्राबाद हाऊस व अन्य एका ठिकाणी उमेदवारांना बोलावून त्यांची मुलाखत घ्यायचा. विविध खात्यांचे नियुक्तीपत्र तो बेरोजगार उमेदवारांना देत होता. मात्र नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यानंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात यायचा. त्यानंतर मंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकारी माझ्याशी नेहमी संपर्कात असल्याचे सांगत तो बेरोजगारांना दम भरायचा. मात्र बेरोजगार तरुणांचा तगादा वाढल्याने त्याने महिनाभरापूर्वी आपले बस्तान गुंडाळले. भंडाऱ्यासह अन्य जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक झाल्याची बाब आता समोर येत आहे. त्याने प्रत्येकाकडून तीन ते दहा लाखांपर्यंत पैसे घेतल्याचे बेरोजगार तरुण सांगत आहेत.
याप्रकरणी भंडारा पोलिसात प्रथम ६ जुलै रोजी तक्रार करण्यात आली. त्यानंतर सुमारे आठवडाभर कोणतीच कारवाई झाली नाही. १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला सुरुवातीलाच जेरबंद करण्याची संधी मात्र पोलिसांनी गमावली. आता विविध पथके त्याच्या मागावर आहेत. दुसरीकडे बेराजगारही त्याचा शोध घेत आहेत. मात्र कुठेही थांगपत्ता लागत नाही.
बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाचे नावही येत आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशी केली जाईल. यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
- शांतनू गोयल, जिल्हाधिकारी, भंडारा
बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या विजय रणसिंग या भामट्याच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. प्रकरणाचा तपास भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात कुठलीही हयगय केली जाणार नाही.
-विनिता साहू जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा