आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:56 AM2019-08-04T00:56:03+5:302019-08-04T00:56:24+5:30

शेतकऱ्यांना पाच वर्षात ५० हजार कोटी रूपयांचा मदतीचा हात दिला. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या सरकारने केली. शेवटच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरूच राहील. सिंचनाचा आणि कृषीपंपाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत दिली.

Our government is always backed by farmers | आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी

आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी

Next
ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । काँग्रेस -राष्ट्रवादीने १५ वर्षात केले नाही ते आम्ही पाच वर्षात तिप्पट करून दाखविले, भंडारा येथे महाजनादेश यात्रेचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शेतकऱ्यांना पाच वर्षात ५० हजार कोटी रूपयांचा मदतीचा हात दिला. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी आमच्या सरकारने केली. शेवटच्या शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरूच राहील. सिंचनाचा आणि कृषीपंपाचा अनुशेष दूर करून शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत दिली. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
युती शासनाच्या पाच वर्षातील कामांचा लेखाजोखा जनतेला सांगण्यासाठी निघालेल्या महाजनादेश यात्रेचे शनिवारी भंडारा शहरात आगमन झाले. त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. परिणय फुके, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती मोहम्मद तारिक कुरैशी, आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आमदार राजेश काशीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, आमदार सुजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, जिल्ह्यात विकासाची गंगा प्रवाहित करायची असेल तर सिंचनाची मुलभूत सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते. हाच हेतू लक्षात घेता आमच्या सरकारने महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासह अन्य प्रकल्पांच्या कार्र्यांना गती देऊन शाश्वत सिंचनाच्या कामावर भर दिला आहे. यावर्षी गोसेखुर्द प्रकल्पातून ५० हजार हेक्टर सिंचन करण्यात आले. पुढील वर्षी ते एक लाख हेक्टरपर्यंत नेण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांची सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी विकासाबाबत मागील पाच वर्षाचा लेखाजोखा सादर करीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारवर आपल्या खास शैलीने ताशेरेही ओढले. प्रजा ही राजा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नेहमी आपल्या भाषणातून आपण लोकसेवक आहोत, असे सांगतात. त्यांच्याच मार्गदर्शनात राज्याला विकासाच्या प्रगतीपथावर नेण्याचे कार्य सुरु केले आहे. युती शासनाने पाच वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामाचा हिशोब देण्यासाठी आणि आपला आशीर्वाद व जनादेश घ्यायला आलो आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात जितकी कामे झाली नाहीत त्यापेक्षा तिप्पट कामे पाच वर्षात भाजपच्या सरकारने करून दाखविली आहेत. सिंचन, प्रकल्पग्रस्त घरकुल योजना, कृषीपंपांचा बॅकलॉग, वर्ग दोनमधील जमीन वर्ग एक केली. जलयुक्त शिवार अभियान, उज्ज्वला योजना, मामा तलावाच्या पुनरूज्जीवनासाठी २०० कोटींची तरतूद, धानाला प्रत्येक वर्षी बोनस व उद्योगाच्या बाबतीत भारतात महाराष्ट्र राज्याला पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवल्याचेही मुख्यमंत्र्यानेही यावेळी ठासून सांगितले. याशिवाय गरीब व गरजू व्यक्तींना जनआरोग्य योजनांच्या माध्यमातून उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आम्ही वापरला असून या पाच वर्षांच्या कार्यकाळात मी किंवा माझ्या मंत्र्यांनी कुठलाही गैरव्यवहार केला नाही, असेही ते म्हणाले. यावेळी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यात लोकसभा निवडणुकीच्या बसपा उमेदवार डॉ. विजया नंदूरकर, राष्ट्रवादीचे अविनाश ब्राम्हणकर आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भाजपाच्या मनोगत अ‍ॅपचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा शहरात महाजनादेश यात्रेचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

प्रहारची घोषणाबाजी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना गोसेखुर्द प्रकल्पग्रस्ताच्या प्रश्नावरून प्रहार कार्यकर्त्यांनी बॅनर दाखवत घोषणा दिल्या. त्यावेळी पोलिसांनी प्रहारचे मंगेश वंजारी, यशवंत टिचकुले, दीपक पाल, संदीप गजभिये, विनोद वंजारी, जगदीश बोंदरे, वसंता पडोळे, एजाज अली सैय्यद, चुन्नीलाल मेश्राम यांना अटक करून नंतर सोडून दिले.

कार्यकर्ते स्थानबद्ध
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा त्रिमुर्ती चौकात येताच वैनगंगा बचाव अभियानाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत काळ्या फिती फडकविल्या. वैनगंगा प्रदूषणाचा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले. यावेळी नितीन तुमाने, यशवंत सोनकुसरे, प्रमोद केसलकर, राजकपूर राऊत यांच्यासह अनेकांना ताब्यात घेतले.

लोकोपयोगी निर्णय घेतले - परिणय फुके
भाजप सरकारने गत पाच वर्षात लोकोपयोगी व शेतकरीहित साधणारे निर्णय घेतले आहेत. कर्जमाफी ही योजना आजपर्यंतची सर्वात मोठी योजना ठरली आहे. शेवटच्या शेतकºयाला लाभ मिळेपर्र्यत ती सुरू राहिल. तसेच धानाला हमीभाव शासनाने घोषीत करावा अशी मागणीही पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी केली. महाजनादेश यात्रेच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. डॉ.फुके म्हणाले, मकरधोकडा येथील इथेनॉल प्रकल्प हा शेतकऱ्यांसह सर्वांनाच हितोपयोगी ठरणार आहे. राज्यातला भंडारा जिल्ह्यातील वनव्याघ्र प्रकल्प हा पाचव्या क्रमांकवर असून या व्याघ्र प्रकल्पात पाच वाघीण सोडणार असल्याचेही फुके यांनी सांगितले. परिणामी भविष्यात पर्यटकांच्या सुविधांसाठी विविध केंद्रांसह अन्य पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहेत. त्यातूनही जिल्ह्यातील १५ ते २० हजार रोजगार उपलब्ध होतील यात शंका नाही. विशेष म्हणजे येणाऱ्या निवडणुकीत भंडारा व गोंदिया जिल्ह्यातून भाजपचेच आमदार निवडून येतील असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. यासह जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत, पंचायत समिती व सहकारी बँकांवर भाजपचाच झेंडा फडकेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

धानाला यंदाही ५०० रूपये बोनस
युती शासनाने दरवर्षी शेतकऱ्यांचा हित लक्षात घेऊन धानाला बोनस जाहीर केला. यावर्षीही भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रती क्विंटल मागे ५०० रुपये बोनस दिल्या जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या घोषणेचे स्वागत केले. २२ मिनिटांपर्यंत चाललेल्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणात सिंचन, गरीब व गरजू लोकांच्या लाभासाठी शासनाने कुठल्या व कोणत्या योजना राबविल्या याची माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Our government is always backed by farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.