जिल्ह्यातील २८७ पैकी २५९ नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 04:00 AM2020-04-25T04:00:00+5:302020-04-25T04:00:02+5:30
मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून २८ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत २८७ पैकी २५९ नमूने निगेटिव्ह आलेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात सुदैवाने अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नसून आतापर्यंत नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या २८७ नमुन्यांपैकी २५९ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबच्या नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २८ अहवालांची प्रतीक्षा आहे.
कोरोना संदर्भात नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २५ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ८४ जणांना सुटी देण्यात आली आहे. नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ३६ व्यक्ती भरती असून १५२ व्यक्तींना त्यामधून सुटी देण्यात आली आहे.
मुंबई-पुणे व इतर राज्यातून आलेल्या २४ हजार ६५ व्यक्ती आले असून त्यापैकी १४ हजार ९९५ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेला आहे. ९०७० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. २३ एप्रिल रोजी १७ व्यक्तींचे घश्यातील नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून २८ अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत २८७ पैकी २५९ नमूने निगेटिव्ह आलेले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाय योजना केल्या जात असून गावपातळीवर आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत तीव्र श्वासदाह रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर बाहेरून येणाऱ्या वाहनांची आणि व्यक्तींची तपासणी केली जाते. प्रत्येक चेकपोस्टवर वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. त्याठिकाणी पोलिसांचा अहोरात्र पाहारा असतो. जिल्ह्यातील नऊ शासकीय वसतीगृहात सेल्टरहोम तयार करण्यात आले आहेत. मजूर आणि स्थलांतरीत लोकांची त्या ठिकाणी निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. गत महिनाभरापासून तेथे अनेक मजूर मुक्कामी आहेत. या सर्वांची जिल्हा सामान्य रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ्ज्ञामार्फत नियमित तपासणी केली जाते. तसेच त्यांना योगा प्रशिक्षणही देण्यात येत आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, अनावश्यक घराबाहेर पडल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने कळविले आहे.
विलगीकरण कक्षातील ‘त्या’ वृद्धेचा अहवाल निगेटिव्ह
श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे २१ एप्रिल रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या एका ८० वर्षीय वृद्धेचा गुरूवारी सकाळी मृत्यू झाला. सदर वृद्धेला मधूमेह, उच्च रक्तदाब व दीर्घकाळ अवरोधी फुफ्फुसाचा आजार असल्याचे निदान झाले आहे. वृद्ध महिेलेचा घश्यातील नमुना तपाणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल निगेटिव्ह आहे. यापुर्वीसुद्धा दोघांचा विलगीकरण कक्षात मृत्यू झाला होता. त्यांचेही नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधीत रुग्ण नसून प्रशासन युद्धपातळीवर उपाययोजना करीत असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची साकोली रुग्णालयाला भेट
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साकोली उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयात कोरोना संदर्भात काय उपाययोजना केल्या याची माहिती घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांनी यावेळी उपस्थित डॉक्टरांना विविध सूचना केल्या.
तीव्र श्वासदाहचे ६९ व्यक्ती दाखल
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय व नागरी आरोग्य केंद्रात फल्यू ओपीडी सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत श्वसनाचा तीव्र आजार असलेल्या ६९ व्यक्तींना येथे भरती करण्यात आले असून यापैकी ६८ व्यक्तींचे घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ६२ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह असून सहा व्यक्तींचा अहवाल अप्राप्त आहे. जिल्हास्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन कक्ष ठेवण्यात आले आहेत. गावपातळीवर घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत रुग्णांचे सर्वेक्षणही करण्यात येत आहे.