३ हजार १५३ नामांकनापैकी ४० अर्ज बाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:18+5:302021-01-01T04:24:18+5:30
भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी नामांकनाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी ३ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेते. ...
भंडारा : जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी नामांकनाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी ३ हजार १५३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले हाेते. गुरुवारी या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यावेळी ४० अर्ज बाद झाले आहे. आता नामांकन मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जानेवारी असल्याने त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. निवडणुकीने गावागावातील राजकीय वातावरण आता तापायला लागले आहे. दरम्यान छाननीसाठी तहसील कार्यालयात उमेदवारांची माेठी गर्दी झाली हाेती.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची घाेषणा हाेताच गावागावात काेराेनाच्या संकटातही उत्साहाचे वारे वाहू लागले. अनेकांनी या निवडणुकीतून गावाचा कारभार हाती घेण्याचे मनसुबे रचले आहेत. दरम्यान २३ डिसेंबरपासून नामांकनाला प्रारंभ झाला. ३० डिसेंबर नामांकनाची अखेरची तारीख हाेती. या दिवसापर्यंत साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६० सदस्यांसाठी ३४० अर्ज, तुमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या १६० सदस्यांसाठी ४३४ अर्ज, लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ सदस्यांसाठी २५२ अर्ज, माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या १४१ जागांसाठी ४०१ अर्ज, पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या २१५ जागांसाठी ५३९ अर्ज, भंडारा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीच्या १११ जागांसाठी ७५८ अर्ज तर लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १५६ सदस्यांसाठी ४२९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते.
गुरुवारी संबंधित तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजतापासून छाननीला प्रारंभ झाला. सातही तहसील कार्यालयात सकाळपासूनच गर्दी झाली हाेती. सायंकाळी उशिरापर्यंत अर्जाची छाननी सुरु हाेती. लाखांदूर तालुक्यातील २५२ अर्जांपैकी छाननीत आठ अर्ज बाद झालेत. माेहाडी तालुक्यातील ४०१ अर्जांपैकी तीन अर्ज बाद झाले तर लाखनी तालुक्यातील ४२९ अर्जांपैकी पाच अर्ज बाद ठरविण्यात आले. इतर तालुक्यातील छाननीचे काम वृत्त लिहिपर्यंत सुरु हाेते.
नामांकन मागे घेण्याची तारीख ४ जानेवारी असून यानंतरच ग्रामपंचातीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर उमेदवारांना चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला प्रारंभ हाेईल. १५ जानेवारी राेजी मतदान आणि १८ जानेवारी राेजी मतमाेजणी हाेणार आहे. भंडारा तहसील कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात छाननीसाठी उमेदवारांची माेठी गर्दी दिसून येत हाेती.
बाॅक्स
ग्रामीण वातावरण तापले
ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाच्या अस्मितेचा प्रश्न. ही निवडणूक आपल्या गटाने जिंकावी यासाठी जीवताेड मेहनत घेतली जाते. निवडणुकीवरुन गावात उभे दाेन गट निर्माण हाेतात. याला काही अपवादही असतात. मात्र या निवडणुकीने ग्रामीण वातावरण चांगलेच तापायला लागले आहे. ४ जानेवारीनंतर या निवडणुकीत रंगत येणार आहे. गावपुढारी प्रयत्नांची पराकाष्ठा करून ग्रामपंचायतीवर झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.