जिल्ह्यात आढळली ५१ शाळाबाह्य मुले
By admin | Published: February 2, 2016 12:30 AM2016-02-02T00:30:19+5:302016-02-02T00:30:19+5:30
शिक्षणाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.
सर्वाधिक मुले शहरी भागातील सर्वांची शाळेत होणार रवानगी
भंडारा : शिक्षणाचा लाभ सर्वांना मिळावा यासाठी राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यावर्षी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. दुसऱ्या शोधमोहिमेत जिल्ह्यात ५१ विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. यात सर्वाधिक प्रमाण शहरी भागातील मुलांचा असल्याची धक्कादायक बाब सर्वेक्षणातून समोर आली.
भाजपप्रणित राज्यशासनाने नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून निकालानंतर पुन:परिक्षा घेण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला. यात पास झालेल्या विद्यार्थ्यांना लगेच महाविद्यालयात प्रवेश दिला गेल्याने त्यांचे शैक्षणिक भविष्य वाचले. याच पद्धतीने अनेक गावात शाळाबाह्य मुले असल्याची बाब शिक्षण विभागाच्या लक्षात आली. या अनुषंगाने यावर्षी शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्याचा पुढाकार शालेय शिक्षण विभागाने घेतला.
या अनुषंगाने जुलै व नोव्हेंबर या दोन महिन्यात शाळाबाह्य मुलांची राज्यात शोधमोहीम राबविण्यात आली. यातील अनेक मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्यात आले. भंडारा जिल्ह्यात राबविलेल्या पहिल्या दोन शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेत २४९ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले होते. यानंतर १५ ते ३० जानेवारी पर्यंत शिक्षण विभागाने तिसऱ्यांदा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविली. यात त्यांना यशही आले आहे.
या शोधमोहिमेत जिल्ह्यात ५१ मुले शाळाबाह्य असल्याचे आढळून आले. एक सर्वेक्षण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाशी जुळलेल्या विद्यार्थी व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले. यात जिल्ह्यातील २ हजार ७८१ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे तसेच १८ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात आले. यात ५१ मुले शाळाबाह्य आढळून आले. (शहर प्रतिनिधी)
भंडारा तालुक्यातील सर्वाधिक मुले
या सर्वेक्षणातून मुले शाळाबाह्य आढळून आले असले तरी यात धक्कादायक बाब म्हणजे यातील सर्वाधिक मुले ही शहरी भागात आढळून आले. भंडारा, तुमसर या नगरपालिका क्षेत्रात आढळून आलेल्या मुलांचा सर्वाधिक समावेश आहे. भंडारा तालुक्यात १९ तर तुमसर तालुक्यात १६ शाळाबाह्य मुले आढळून आले.
शैक्षणिक सत्र संपत आले आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होईल. त्यामुळे या नव्याने दाखल होत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वयोगटानुसार वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी विशेष वर्ग, विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. मे व जून महिन्याच्या सुटीच्या कालावधीतही त्यांच्याकडून अभ्यासाचे धडे गिरविण्यात येतील व पुढील सत्रात त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमानुसार वर्गात प्रवेश दिल्या जाईल.
६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात आली. यात ५१ विद्यार्थी आढळून आले. त्यांची जवळच्या जिल्हा परिषद व खासगी शाळेत नोंद करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील केल्या जाईल.
-के.झेड. शेंडे
शिक्षणाधिकारी, भंडारा.