१७३१ गुन्ह्यांपैकी १५४३ गुन्ह्यांचा केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 04:38 PM2024-07-18T16:38:56+5:302024-07-18T16:42:19+5:30

जिल्हा पोलिसांची कारवाई : ९ धोकादायक व्यक्तींना स्थानबद्ध, एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल

Out of 1731 crimes, 1543 crimes were solved | १७३१ गुन्ह्यांपैकी १५४३ गुन्ह्यांचा केला उलगडा

Out of 1731 crimes, 1543 crimes were solved

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था चोखपणे बजावण्यात भंडारापोलिस यशस्वी ठरले आहेत. जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या १७३१ गुन्ह्यांपैकी १५४३ गुन्ह्यांची उकल करून ३६०८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एमपीडीए कायद्यानुसार जिल्ह्यातील ९ धोकादायक व्यक्तींना एका वर्षाकरिता स्थानबद्ध करण्यात आले. ही कारवाई सन २०२४ मधील जून महिन्यापर्यंतची आहे.


महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५५ अन्वये एक गुन्हेगारी टोळी तर महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ५६ आणि ५७ नुसार भंडारा जिल्ह्यातील ४३ जणांचे प्रस्ताव मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे प्रलंबित आहेत. जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते जून २०२४ मध्ये दाखल ६ गुन्ह्यांपैकी सर्वच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न करण्याचे ९ गुन्हे दाखल असून, या सर्व गुन्ह्यांची उकल भंडारा पोलिसांनी केली आहे.


भंडारा पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील पोलिस ठाण्यांमध्ये मालमत्ताविषयक ३९८ गुन्हे दाखल झाले. यापैकी २६६ प्रकरणांचा छडा लावण्यात आला. याची टक्केवारी ६७ इतकी आहे. पोलिस दीदी, बीट मार्शल आणि दामिनी पथकाकडून नियमितपणे करण्यात येणाऱ्या पेट्रोलिंगमुळे अत्याचारासंबंधाने दाखल गुन्ह्यांमध्येही घट झाल्याचे दिसून येते. चालू वर्षात जूनअखेर अतिप्रसंगाचे दाखल ३६ गुन्हे पोलिसांनी तपासात उघड केले आहेत. विनयभंगाचे दाखल ५४ गुन्ह्यांपैकी ५२ गुन्ह्यांचा तपास करून महिलांना न्याय मिळवून दिला आहे. महिला, मुली आणि लहान मुलांचे अपहरण आणि अपनयन याबाबत ४७ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ४२ गुन्ह्यांचा उलगडा भंडारा पोलिसांनी केला आहे.


एनडीपीएस कायद्यांतर्गत २९ कारवाया
भंडारा पोलिसांनी जून २०२४ पर्यंत लपूनछपून सुरू असलेल्या जुगाराच्या २७२ ठिकाणांवर आणि दारूच्या १०९६ ठिकाणांवर धाड घातली. अवैध हत्यारासंबंधाने ११ तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत २९ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईमध्ये ४४ किलो ६७१ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३४ हजार ९३९ वाहनचालकांवर कारवाई करून २४ लाख ७७ हजार ६०० रुपये दंडापैकी ६ लाख ८५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अमली पदार्थाचे सेवन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर ५२८ गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात आली आहे.


"जिल्ह्यात घडलेल्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात जिल्हा पोलिस प्रशासनाला मोठे यश लाभले आहे. यात १७ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यात मोलाचा सहभाग आहे."
-लोहित मतानी, पोलिस अधीक्षक, भंडारा 

Web Title: Out of 1731 crimes, 1543 crimes were solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.