मांगली येथे डेंग्यूसदृश आजाराची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:27 AM2021-07-17T04:27:25+5:302021-07-17T04:27:25+5:30
मांगली (चौरास) येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
मांगली (चौरास) येथे डासांचा प्रादुर्भाव वाढला असला तरी ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात अनेक दिवसांपासून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबविली गेलेली नाही किंवा ग्रामपंचायतीने औषध व धूर फवारणी केली नाही. गावात डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबवावी, यासाठी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे नागरिकांनी तक्रारी करूनदेखील सुस्त ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे नागरिकांनी सांगितले. गावात डासांचे साम्राज्य वाढल्याने नागरिकांना मलेरिया, डेंग्यू, तसेच साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. गावात काहीजणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली असल्याचे नागरिकांनी सांगितले. ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रार करूनदेखील गावातील पाण्याचे डबके तसेच गटारीच्या सांडपाण्याचे नियोजन, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले व त्यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना ग्रामपंचायतींकडून होत नसल्याने ग्रामपंचायतीचा कर का भरायचा, असा संतप्त सवाल नागरिकांनी करून ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.
ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबविण्यापाठोपाठ धूर व औषध फवारणी करून डास प्रतिबंधात्मक निर्मूलन मोहीम राबवावी. रोवणी हंगाम सुरू असल्यामुळे गावातील लोक बाहेरील रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे गावातच आरोग्य चाचणी शिबिर आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोट
मांगली (चौ) गावात अनेक महिन्यांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. मात्र ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची औषधे किंवा धुराची फवारणी मोहीम राबविली जात नाही. डेंग्यू आजाराने गावात थैमान घातल्यावर ग्रामपंचायत प्रशासन दखल घेणार का?
- चेतन पडोळे, जिल्हा सचिव, भायुमो, भंडारा