नवेगाव येथे डायरीयाचा प्रकोप, तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:43 AM2021-09-16T04:43:46+5:302021-09-16T04:43:46+5:30
डेव्हीड मनोहर चामलाटे (१९) असे मृताचे नाव असून साेमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण आकांक्षा मनोहर चामलाटे (११) ...
डेव्हीड मनोहर चामलाटे (१९) असे मृताचे नाव असून साेमवारी त्याचा मृत्यू झाला. तर त्याची बहीण आकांक्षा मनोहर चामलाटे (११) ही तुमसर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. गावात जवळपास ४० जण डायरीयाने बाधित आहे. गावात डायारीयाची लागण झाल्याची जिल्हा परिषदचे माजी सदस्य महेंद्र शेंडे यांनी आरोग्य विभागा दिली असून तातडीने ग्रामपंचायत कार्यालयात शिबिर लावण्यात आले आहे.करडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.जी. तलमले यांच्या मार्गदर्शनात निलज बुज. उपकेंद्राचे डॉ. भूषण फेंडर, पालोरा उपकेंद्राचे डॉ. श्रावणकर, आरोग्य सेविका हुमणे यांचे पथक रूग्णवाहिकेसह गावात दाखल झाले. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालयात तात्पुरते शिबिर लावण्यात आले. डॉ. तलमले, महेंद्र शेंडे, सरपंच अनवर सपाटे, माजी उपसरपंच विजय बांते, जगन गोमासे यांनी गावात फिरून रूग्णांची पाहणी केली. त्यावेळी भयावह परिस्थिती दिसून आली. अनेक जण अतिशय अशक्त दिसून आले. चालणे व बोलणेही कठीण झाल्याचे दिसत होते.
मृत डेव्हीड चार दिवसापासून उलटी व हागवणीने त्रस्त होता. करडी येथे उपचार सुरू होते. मात्र सोमवार १३ सप्टेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. त्याची लहान बहीण आकांक्षा सुद्धा डायरीयाने ग्रस्त असून तिच्यावर तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोग्य सेविकेचा हलगर्जीपणा
नवेगाव येथे शनिवारी कोरोना लसीकरण करण्यात आले. परंतु आरोग्य सेविकेने गावात साधी चौकशी केली नाही. यापूर्वी येथे असलेल्या आरोग्य सेविका नेहमी गावात फिरून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायच्या, विचारणा करायच्या. मात्र, विद्यमान आरोग्य सेविका गृहभेटी देण्याचे सौजन्य दाखवित नाही, असा आरोप आहे. पूर्वी असलेल्या आरोग्य सेविकेची बदली थांबविण्याचे पत्र ग्रामपंचायतीने दिले होते. परंतु करडी आरोग्य केंद्राच्याअधिकाऱ्यांनी त्यांची बदली मुंढरी येथे केली. त्यामुळे गावात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप चिंतामण लिबुडे व ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्याचे नमुने पाठविले तपासणीला
गावात डायरीयाची साथ सुरु असतांनाही आरोग्य सेविकेने गावात साधी चौकशी व पाहणी केली नाही. वेळीच करडी करडी प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली असती तर ही वेळ आली नसती, असा आरोप होत आहे. प्रकरणाची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. डॉ. तलमले यांच्या सूचनेनुसार टोलीवरील पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून मोहाडी येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
150921\img-20210915-wa0106.jpg~150921\img-20210915-wa0095.jpg
ग्रामपचायत कार्यालयात लागले शिबिर~गावात पाहणी करताना डॉक्टर तलमले, महेंद्र शेंडे, सरपंच सपाटे व अन्य