दुसऱ्या टप्यातील निवडणुकीवर ओमायक्रॉन संसर्गाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 05:00 AM2022-01-02T05:00:00+5:302022-01-02T05:00:44+5:30
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडुकीपेक्षा दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ओमायक्रॉनच्या सावटात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झालेल्या जागांवरील निवडणुकीवर आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सावट आहे. जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांसाठी ही निवडणूक १८ जानेवारी होत आहे. मात्र, प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधाने उमेदवारांपुढे प्रचाराचे दिव्य आहे. सार्वजनिक कार्यक्रमावर उपस्थितीच्या मर्यादेचे बंधन आणल्याने सभा घेणेही कठीण होणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडुकीपेक्षा दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकओमायक्रॉनच्या सावटात होत आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी आदेश जारी करून निर्बंध आणले आहेत. त्यात राजकीय कार्यक्रम बंधिस्त असो, की मोकळ्या जागेत, केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीतच घ्यावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पूर्व परवानगी घेणेही आवश्यक आहे. तसेच प्रचार करताना कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. अशा स्थितीत प्रचार कसा करावा, असा प्रश्न उमेदारांपुढे राहणार आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे राज्यस्तरीय नेत्यांच्या सभाही घेता येणार नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत अनेक सभा घेण्यात आल्या होत्या. परंतु आता स्थानिक पातळीवरच सभा घेण्यापेक्षा बैठका घेण्यावरच भर द्यावा लागणार आहे.
मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी रोखण्याचे आव्हान
- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही टप्यातील निवडणुकीची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांची मतमोजणी संबंधित तालुकास्थळी होणार आहे. ओमायक्रॉनचे सावट असल्याने प्रशासनाला मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे. यासोबतच मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी कशी टाळावी हाही मोठा प्रश्न राहणार आहे. कारण प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना घेवून मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर निघणाऱ्या विजय मिरवणुकीतही गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रशासन विजय मिरवणुकीला परवानगी देणार की नाही ही शंकाही अनेकांना सतावत आहे.