यांत्रिकीकरणात घोंगडी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:40 PM2017-12-17T23:40:16+5:302017-12-17T23:41:41+5:30
ग्रामीण भागात एकेकाळी विशेष मागणी असलेली घोंगडी आता यांत्रिकीकरणाच्या युगात दिसेनाशी झाली आहे.
प्रकाश हातेल ।
आॅनलाईन लोकमत
चिचाळ : ग्रामीण भागात एकेकाळी विशेष मागणी असलेली घोंगडी आता यांत्रिकीकरणाच्या युगात दिसेनाशी झाली आहे. या घोंगडीची मागणी दिवसेंदिवस कमी झाली असून या उद्योगावर उपजीवीका भागविणाऱ्या धनगर समाजाची वाताहत होत आहे.
मेंढीच्या लोकरपासून घोंगडी, मफलर, स्वेटर बसण्याच्या पट्ट््या (चटई) तयार करुन त्याची भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि आंध्रप्रदेशात विक्री केली जाते. मेंढीपासून मिळणारी लोकर पिंजून काढली जाते. यानंतर कुटूंबातील सदस्य चरख्यावर धागे काढून सुताच्या कांड्या तयार करतात. त्या कांड्याना पाटी या साधणावर 'ताना' म्हणून पसरवितात त्यावेळी ती १० फुट लांब असते. नंतर ती मागावर (यंत्रावर) लावून विणकाम केले जाते. जवळपास आठ फुट लांबीचे 'थान' तयार होते. त्याला पट्टी असे म्हणतात. त्याप्रमाणे दोन पट्यांना जोडून एक घोंगडी तयार होते. ग्रामीण भागातील धनगर बांधवांनी तयार केलेली घोंगडीला हिवाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मागणी असते. घोंगडीच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या समाजाला गावोगावी फिरुन घोंगडी व स्वेटरची विक्री करावी लागते. याकरिता वस्तुविनिमय या पारंपारिक पध्दतीचा अवलंब केला जातो. नव्या काळात घोंगडी घेणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. धनगर समाजाने घोंगडी व्यवसायाला तिलांजली देवून गादी तयार करण्याचा व्यवसाय स्वीकारला आहे. ग्रामीण हस्तकलेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
इथे बनते घोंगडी
जिल्ह्यातील चिचाळ, नेरला, जैतपूर, गोसे, रोहा, सिलेगाव, सिहोरा, डोंगरला, निमगाव, खातखेडा, दांडेगाव, कन्हाळगाव, मेंढा, खैरी (ते) मिटेवानी, तिरोडी आदी गावात धनगर समाज मोठ्या प्रमाणावर आहे. धनगर समाजातील लोक शेळ्या मेंढ्याचे पालन करुन मेंढ्याच्या लोकरीपासून घोंगडी तयार करतात. घोंगडी व्यवसायात गुंतलेली संख्या आता रोडावली आहे.
विणकाम प्रशिक्षण
ग्रामीण हस्तकलेला उत्तेजन व प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने जिल्हा उद्योग कार्यालयामार्फत विणकामाचे प्रशिक्षण देण्याचे सुरु केले. मात्र त्यात शासनाच्या अधिकाऱ्यांनी विणकामाचे प्रशिक्षण अशा लोकांना दिले आहे की ज्यांना विणकामाचा व घोंगडी उद्योगाचा तिळमात्रही अनुभव नाही. जिल्हा उद्योगामार्फत प्रशिक्षण दिल्याने मात्र धनगर समाजातील खरे कारागीर त्या प्रशिक्षणापासून वंचित राहिले आहेत.
घटनात्मक अधिकार
धनगर समाजाला घटनात्मक अधिकार डावल्याने या समाजाला एन टी ‘क’ चा लालीपाप दिला. मात्र धनगर समाज संविधानात्मक तरतुदीनुसार अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर ओरान, धनगड, धनगर या जातीचा स्पष्ट समावेश आहे असे असतांनाही धनगर समाज ६६ वर्षापासून अनु. जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. तो अधिकार महाराष्ट्र शासनाने केंद्राला ठराव पाठवून धनगर समाज बांधवांचा एस.टी.चा हक्काची अमलबजावणी करण्याची मागणी समाज बांधवांकडून होत आहे.