वनाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 05:45 PM2023-06-29T17:45:21+5:302023-06-29T17:46:35+5:30

एसीएफ नागुलवार यांच्यावर नागपुरात उपचार : अद्याप कोणालाही अटक नाही

Over 100 villagers have been charged in the case of attack on forest officials | वनाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

वनाधिकाऱ्यांवर हल्ला प्रकरणी शंभरावर ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : पवनीपासून १५ किलोमीटर अंतरावरील खातखेडा येथे बुधवारी २८ जूनला नरभक्षक वाघाने हल्ला करुन ईश्वर सोमा मोटघरे या गावकऱ्याचा बळी घेतला होता. या घटनेनंतर घटनास्थळी गेलेल्या वनाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या सुमारे १०० ते १५० ग्रामस्थांवर वन विभागाने गुन्हे दाखल केले आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. जखमींवर नागपुरात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार झाल्याचे कळल्यावर घटनास्थळापासून तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावरील गुडेगाव वनपरिक्षेत्रातून भंडाराचे सहायक उपवनसंरक्षक यशवंत नागुलवार, सावरलाचे क्षेत्रसहाय्क दिलीप वावरे, धानोरीचे वनपाल गुप्ता व अन्य वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र वाघाला पकडल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही, प्रेत उचलू देणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. यातून उद्भवलेल्या संघर्षानंतर या पथकाला शिवीगाळ करीत गावकऱ्यांनी हल्ला केला होता. बीट रक्षक संगीता घुगे यांच्या तक्रारीवरुन मुन्ना तिघरे (रेवनी), सितकुरा काटेखाये, रवी थाटकर, राजकुमार काटेखाये, हिवराज मोटघरे (सर्व रा.खातखेडा) यांच्यासह अन्य १०० ते १५० नागरिकांविरुद्ध भादंवि कलम १४३,१४७, ३५३, ३३२, ४०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार, गावकऱ्यांच्या हल्ल्यात वन अधिकारी जखमी

पाठलाग करून केली मारहाण

जमावाचा रोष पाहून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र संतप्त जमावाने त्यांचा पाठलाग करुन पकडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेची माहिती मोबाईलवरुन पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जमावाच्या तावडीतून सुटका केली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागुलवार जबर मारहाणीत बेहोश होऊन खाली पडले होते. वनपाल गुप्ता व वावरेसुद्धा जखमी झाले होते. नागुलवार यांची प्रकृती गंभीर असल्याने  त्यांच्यावर नागपुरात अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Over 100 villagers have been charged in the case of attack on forest officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.