जिल्ह्यात सात हजारांवर कर्मचाऱ्यांना कोराेना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:00 AM2020-12-16T05:00:00+5:302020-12-16T05:00:28+5:30
जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व महीला बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. लसीकरणाबाबतची पूर्वतयारी वेगाने सुरु आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरुन लसीकरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : बहूप्रतिक्षीत कोराेना लसीकरणाच्या हालचालींना वेग आला असून जिल्ह्यातील फ्रंटलाईन वर्कर असलेल्या ७ हजार १३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्यात लस देण्यात येणार आहे. या लसीकरणासंदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी विविध अधिकारी वर्गाचा समावेश असलेल्या जिल्हा कृती दलाची (टॉस्क फोर्सची) बैठक घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला.
जिल्ह्यातील सात हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात येणार असून प्राधान्यक्रमाने पहिल्या टप्प्यात आरोग्य विभाग व महीला बाल विकास विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जाणार आहे. लसीकरणाबाबतची पूर्वतयारी वेगाने सुरु आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरुन लसीकरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भंडारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग, एकात्मीक महिला बाल विकास विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेले खाजगी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाडी कर्मचारी, आशासेविका, जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य पथके, अधिकारी - कर्मचारी अशा ५८ संस्थांचे एकत्रीकरण करुन प्राधान्य क्रमाने पहिल्या टप्प्यात लसीकरण केले जाणार आहे. कोरोना काळात प्रत्यक्षात काम केलेल्या कर्मचारी वर्गाला प्रथमत: ही लस टोचली जाणार आहे. जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, महिला बालविकास विभाग कर्मचारी ५७९६, चिखलामाईन अधिकारी व कर्मचारी १२ व नोंदणीकृत खाजगी आरोग्य सेवा देणारे १३२८ असे एकूण ७१३६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणे अपेक्षित आहे.
लसीकरणासाठी आरोग्य विभागामार्फतच्या संकेतस्थळावर नोंद केलेले अधिकारी कर्मचारीच या लसीकरणासाठी पात्र ठरतील. लसीकरणाच्या पूर्वतयारीसाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. हे लसीकरण कर्मचाऱ्यांना काही दिवसांच्या अंतराने दोनदा केले जाणार आहे. ज्या कंपनीची लस सुरुवातीला दिली गेली आहे तीच लस दुसऱ्यांदा दिली जाणार आहे. इतर कंपनीची लस त्यांना दिली जाणार नाही. जिल्ह्यातील माता बालसंगोपन अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आदीचे राज्यस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आलेले असून हे अधिकारी लसीकरणाची अंमलबजावणी व नियोजन करणाऱ्या यंत्रणांना प्रशिक्षण देतील. लसीकरणासाठीची साहित्य सामग्री राज्यस्तरावरुन प्राप्त होणार आहे व लवकरच प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनयकुमार मून, जिल्हा शल्य चिकीत्सक प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथुरकर व अधिकारी उपस्थित होते.
लसीकरणासाठी तालुकानिहाय जागेचा शाेध सुरु
कोरोना लस प्राधान्याने हेल्थ केअर वर्कर यांना देण्यात येणार असून त्यांचे रजिस्ट्रेशन, फोटो आयडी असणे अत्यावश्यक आहे. दुसरा डोजचा मॅसेज आधार लिंक असलेल्या मोबाईलवर येईल, तेव्हा दुसरा डोज घ्यावयाचा आहे. ही लस मोफत देण्यात येणार आहे. प्रत्येक लाभार्थीला मोबाईलवर मॅसेज येणार आहे. यासाठी लसीकरणाचे ठिकाण शोधण्याचे काम युध्दपातळीवर आरोग्य विभागामार्फत लसीकरणासाठीचे नियोजन सुरु आहे. लसीकरणासाठी किमान १०० जण सुटसुटीत राहु शकतील अशी तालुकानिहाय स्थळे शोधण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी वेटींग रुम, व्हॅक्सीनेशन रुम व ऑब्झरवेशन रुम असेल. प्रत्येक पथकामधे ४ व्हॅक्सीनेशन अधिकारी, १ व्हॅक्सीनेटर अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.