लाखांदूर कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:28+5:302021-04-28T04:38:28+5:30
तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. या परिस्थितीत उपचार करण्यासाठी शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू ...
तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. या परिस्थितीत उपचार करण्यासाठी शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. मात्र येथे उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबी फ्ल्यू गोळ्या व ॲम्बुलन्स सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णांना भंडारा येथे पाठविले जात आहे. यासबंधात तालुक्यातील नागरिकांनी सुविधा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. तसेच लाखांदूर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांसह खासदार प्रफुल पटेल यांना निवेदन दिले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ऑक्सिजन बेडसह आरोग्यविषयक सुविधा तत्काळ उपलब्ध करण्याचे निर्देशित केलेले होते. या पत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली असून लवकर सर्व सुविधा येथे मिळणार असल्याचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी सांगितले.
बॉक्स
कॉंग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची तहसीलदारांसाबत चर्चा
येथील कोविड केअर केंद्रात होणारी विविध असुविधा सोडविण्यासाठी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधला. त्यांना असुविधेची माहिती दिली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडसह ॲम्बुलन्स व अन्य आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती दिली. यावेळी मुख्याधिकारी सौरभ कावळे, ठाणेदार मनोहर कोरेटी, नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, डॉ. लांजेवार, डॉ. बोरकर, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष वासुदेव तोंडरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, बाजार समिती सभापती सुभाष राऊत, रामचंद्र राऊत, डॉ. सुरेश ब्राह्मणकर, राजू पालिवाल, सुभाष खिलवानी, प्रकाश देशमुख, जितू सुखदेवे, मनोज बन्सोड, तुलाराम विठोले उपस्थित होते.