लाखांदूर तालुक्यात ऑक्सिजन प्लांट, लसीकरणावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:26 AM2021-05-28T04:26:08+5:302021-05-28T04:26:08+5:30
लाखांदूर : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून धडा घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लाखांदूर तालुक्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ...
लाखांदूर : काेरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून धडा घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लाखांदूर तालुक्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून ऑक्सिजन प्लांट, लसीकरण आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज झाला असून यापुढे कोरोना उपचारासाठी भंडारा येथे जाण्याची गरज पडणार नाही.
कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात हाहाकार उडाला होता. इतर तालुक्यांच्या मानाने दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या कमी असली तरी सुरुवातीला येथे सुविधा नव्हत्या. त्यामुळे कोराेनाबाधितांना थेट भंडारा येथे जाऊन उपचार करावे लागत होते. मात्र काही काळातच येथे कोविड केअर सेंटर आणि ऑक्सिजन बेडची सुविधा तयार करण्यात आली. आरोग्य विभागासह तालुका प्रशासनाने परिश्रम घेत कोरोनाबाधितांची संख्या कमी करण्यात यश मिळविले. तालुक्यात पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक होते.
तालुक्यात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. त्यांच्या संस्थात्मक विलगीकरणासह उपचारासाठी १० एप्रिलला स्थानिक लाखांदूर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात कोविड केअर केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला सदर कोविड केअर केंद्रात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी भंडारा येथे दाखल केले जात होते. ही बाब शासनाला लक्षात येताच तालुक्यातील कोविड केअर केंद्रात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याअंतर्गत सध्या १५ जंबो ऑक्सिजन सिलिंडर, ६१ साधे ऑक्सिजन सिलिंडर, १३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन , ७४ खाटा, फ्लोमीटर, बायपॉप मशीन, स्ट्रेचर व आवश्यक औषधी साठा उपलब्ध करण्यात आला आहे.
तालुका आरोग्य विभागाअंतर्गत तालुक्यात लसीकरणावर अधिक भर दिला जात असून स्वत: तालुका आरोग्याधिकारी व अन्य सहकारी नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करीत आहेत. तालुक्यातील ज्येष्ठ ९ हजार ९९६ व्यक्तींना पहिला, तर ३ हजार ३९० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ७ हजार ८६७ नागरिकांना पहिला डोस, तर १ हजार १०४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. तर १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ९१६ तरुणांचे पहिल्या डोसअंतर्गत लसीकरण करण्यात आले.
बॉक्स
लहान बालकांच्या लसीकरणाची पडताळणी सुरू
तालुक्यातील तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना त्यांच्या वयोमानानुसार नियमित लसीकरणाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व लसी दिल्या की नाहीत याची पडताळणी सुरू आहे. पुढील काळात या बालकांना कोविड संसर्ग झाल्यास इतर आजारांमुळे गुंतागुंत वाढू नये याकडेदेखील तालुका आरोग्य विभाग लक्ष देत आहे. सोबतच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षितही केले जात आहे.
बॉक्स
लवकरच ऑक्सिजन प्लांट होणार तयार
कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना विलगीकरणासह उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या लाखांदूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये लवकरच ऑक्सिजन प्लांटचे निर्माणकार्य पूर्ण होणार असून त्या अंतर्गत दाखल रुग्णांना उपचारासाठी जवळपास १५० ऑक्सिजन बेड उपलब्ध केले जाणार असल्याची माहिती लाखांदूरचे तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांनी दिली आहे.
कोट
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज असून लाखांदूर येथील कोविड केअर केंद्रात ऑक्सिजन प्लांट व बेडची व्यवस्था वाढविण्यात आली आहे. लहान मुलांच्या नियमित लसीकरणाची पडताळणी करून शासन निर्देशानुसार उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
डॉ. नलिनीकांत मेश्राम
तालुका आरोग्याधिकारी, लाखांदूर