जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:19+5:302021-04-28T04:38:19+5:30
भंडारा : कोणताही रुग्ण प्राणवायूविना तडफडून मरू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून ...
भंडारा : कोणताही रुग्ण प्राणवायूविना तडफडून मरू नये यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प सोमवारी कार्यान्वित करण्यात आला. ५०० क्युबिक मीटर क्षमता असलेल्या या प्रकल्पातून २४ तासात ११० जम्बो सिलिंडर्स भरले जाणार आहेत. थेट सेंट्रलाइज प्रणालीद्वारे आयसीयू आणि आयसोलेशन वाॅर्डात ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात सर्वत्र कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला आहे. रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनचीही निकड असते. रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला. विविध ठिकाणावरून ऑक्सिजनचे सिलिंडर्स बोलावून रुग्णांचे प्राण वाचविण्याची धडपड सुरू आहे. मात्र बाहेरून येणारा सिलिंडर्स वेळेवर कामी पडेलच याची खात्री नसते. त्यामुळेच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प उभारला. केंद्र सरकारच्या योजनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी ७० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. अतिशय कमी वेळात हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. ५०० क्युबिक मीटर ऑक्सिजन निर्मितीची या प्रकल्पाची क्षमता आहे. २४ तासात ११० जम्बो सिलिंडर्स भरू शकेल एवढा ऑक्सिजन येथे निर्माण केला जाणार आहे. सोमवारी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला तेव्हा १२ तासात ५० सिलिंडर्स भरण्यात आले.
हा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयावर असलेला ऑक्सिजन पुरवठ्याचा ताण कमी झाला आहे. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन पुरवठा करणे यामुळे सहज शक्य झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पातून सेंट्रलाइज प्रणालीद्वारे ऑक्सिजन थेट आयसीयू आणि आयसोलेशन वाॅर्डात पुरविला जाणार आहे. कोरोना उद्रेकाच्या काळात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाॅक्स
वीज गेली तरी ऑक्सिजन पुरवठा सुरू राहणार
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्पाचा वीजपुरवठा खंडित झाला तरी रुग्णांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा थांबणार नाही. येथे जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र वीजपुरवठा खंडित ते जनरेटर सुरू करणे या पाच ते दहा मिनिटांच्या अवधीतही रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी ड्युरा सिलिंडर्सची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सेंट्रलाइज पाइपलाइनच्या माध्यमातून ड्युरा सिलिंडर्समधून ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे.
बाॅक्स
जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना आले यश
संवेदनशील म्हणून ओळखले जाणारे जिल्हाधिकारी कोरोना संसर्गाच्या काळात प्रत्येक बाबीवर नजर ठेवून आहेत. प्रशासनाला मार्गदर्शनासोबतच अडीअडचणी सोडविण्यासाठी तत्परतेने पुढाकार घेत आहेत. त्यांच्याच प्रयत्नातून हा ऑक्सिजन प्रकल्प अगदी कमी वेळात कार्यान्वित झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोट
ऑक्सिजनची रुग्णांना नितांत गरज असते. हा प्रकल्प अशा रुग्णांना दिलासा देणारा ठरणार आहे. जिल्हा रुग्णालयातील या प्रकल्पातून अहोरात्र ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मितीची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
- साहेबराव राठोड, नोडल अधिकारी तथा अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय