लाखनीच्या कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:38 AM2021-04-28T04:38:26+5:302021-04-28T04:38:26+5:30
चंदन मोटघरे लाखनी : तालुक्यातील कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून ऑक्सिजन गॅस सिलिंडरची आवश्यकता वाढत असल्याने लाखनी ...
चंदन मोटघरे
लाखनी : तालुक्यातील कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात ठेवून ऑक्सिजन गॅस सिलिंडरची आवश्यकता वाढत असल्याने लाखनी येथील समर्थ महाविद्यालयातील भगिनी निवेदिता वसतिगृहातील कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात आले आहे. लोकमत हॅलो भंडारामध्ये ‘लाखनीत कोरोना केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडचा अभाव’ या शीर्षकाचे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष व तहसीलदार मल्लिक विरानी यांनी खासगी व्यावसायिकाकडचे सिलिंडर अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. लाखनी शहरातील सहा फेब्रिकेशनचे काम करणाऱ्या व्यावसायिकाकडून सिलिंडर जमा करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयाच्या यंत्रणेमार्फत सिलिंडरमध्ये ऑक्सिजन भरून कोरोना केअर सेंटरमध्ये जमा करण्यात आले आहेत. ऑक्सिजनची सुविधा नसल्याने रुग्ण दाखल करण्यात येत नव्हते. आज २५ पेक्षा जास्त सिलिंडर जमा करण्यात आले आहेत. तसेच पालांदूर (चौ.) व इतर गावातून सिलिंडर जमा करून ५० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानिक कोरोना केअर सेंटरमध्ये एक डॉक्टर, एक परिचारिका, एक शिक्षक व एक होमगार्डची सेवा अधिग्रहित केली आहे. परिसरात स्वच्छता ठेवण्यात येत असते. रुग्णासाठी भोजनाची व्यवस्था केली आहे.