पाण्याअभावी भात व ऊस पीक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 10:54 PM2019-04-14T22:54:10+5:302019-04-14T22:54:37+5:30
तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुका भात पीक उत्पादनात अव्वल असून उन्हाळी धान पिकाला केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पाण्याअभावी धान पीक धोक्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीजपुरवठा केला जात होता. त्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. दुसरीकडे सूर्य आग ओकत आहे. पाण्याअभावी धान पिकाला धोका निर्माण झाला आहे.
तुमसर तालुक्यात यावर्षी उन्हाळी धानपिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. विहिरीत पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु थ्री फेस वीज पुरवठा केवळ आठ तास करणे सुरु आहे. किमान बारा तास वीज पुरवठा करण्याची गरज आहे. आठवड्यात रात्री १२ नंतर तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. तर चार दिवस दिवसा वीज पुरवठा वीज वितरण कंपनी करीत आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान दहा तास वीज पुरवठा वीज वितरण कंपनीने केले होते.
लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा आठ तास वीज पुरवठा देणे सुरु केले आहे. भर उन्हात पाण्याअभावी धान पीक करपू लागले आहे. शेतकऱ्यांनी धान व नगदी ऊस पिकाची लागवड केली आहे. ऊसाचे पिकही येथे धोक्यात आले आहे. धानाला जादा भाव देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर तुमसर तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली हे विशेष. वीज पुरवठा तासात वाढ न केल्याने येथील शेतकऱ्यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.
तुमसर तालुक्यात शेतकऱ्यांनी धान व ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात आहे. पिकांना पाणी पुरेसा होत नाही. सध्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. किमान १२ तास वीज पुरवठा करण्यात यावा.
-हिरालाल नागपुरे, पं.स. सदस्य, सिलेगाव.