धान मोजणीला मुदतवाढीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:17+5:302021-06-30T04:23:17+5:30
पालांदूर : उन्हाळी धान मोजणी अत्यंत संथगतीने सुरू आहे. कधी गोदाम तर कधी बारदाना समस्या आ वासून उभी राहिल्याने ...
पालांदूर : उन्हाळी धान मोजणी अत्यंत संथगतीने सुरू आहे. कधी गोदाम तर कधी बारदाना समस्या आ वासून उभी राहिल्याने धान खरेदी प्रभावित झाली आहे. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने उन्हाळी धान खरेदी कासवगतीने सुरू आहे. ३० जून ही शेवटची तारीख असल्याने शेतकरी धान मोजणीच्या विवंचनेत सापडला आहे. यासाठी मुदतवाढीची मागणी होत आहे. गत चार ते पाच दिवसांपासून आधारभूत खरेदी केंद्रावर बारदान्याचा तुटवडा असल्याने शेतकरी उन्हाळी धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु लोकप्रतिनिधी मात्र माेर्चे काढण्यात व्यस्त आहेत. लाखनी तालुक्यातील पालांदूर येथील आधारभूत केंद्रावर बारदाना नसल्याने धान खरेदी प्रभावित झाली आहे. आधारभूत खरेदी केंद्र शेतकऱ्यांना मोठे आधारव्रत ठरलेले आहेत. आधारभूत नसते तर शेतकऱ्यांचे बेहाल झाले असते. हक्काचे आधारभूत केंद्र असूनही खरेदी केंद्रांचे नियोजन व्यवस्थित नसल्याने शेतकऱ्यांना त्याचे दुष्परिणाम होत आहेत. १ मे पासून धान खरेदीचे आदेश असताना जून महिन्याच्या अर्ध्यात धान खरेदी सुरू करण्यात आले. उरलेल्या दिवसांत धान खरेदी निश्चितच अशक्य आहे. संपूर्ण भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचा प्रश्न दोन्ही हंगामात प्रामुख्याने उभा असतो. शासनाजवळ स्वतःची कोठार व्यवस्था अपुरी असल्याने खासगी कोठारावर धान खरेदीचा डोलारा सजवला जातो. गत कित्येक वर्षांपासून ही समस्या आ वासून उभी आहे. मात्र, शासन अथवा शासनाचे प्रतिनिधी यावर अजूनही अपेक्षित प्रयत्नशील नाहीत. त्यामुळे धान खरेदी प्रभावित झालेली आहे. काही खरेदी केंद्रांनी कोठार व्यवस्था तात्पुरत्या स्वरुपात मिळवली. परंतु त्यांना बारदानाची समस्या भेडसावत आहे. खरेदी करणारे वरिष्ठ अधिकारी याबाबतीत वेळेत उपाययोजना करू न शकल्याने जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी धान खरेदी बंद आहे. लोकप्रतिनिधी जिल्ह्यात लक्ष घालायला अपुरे पडत असल्याचे चित्र सर्वांच्या तोंडी आहे. मातब्बर राजकारणी असूनही जिल्ह्याला अजूनही विकासाची प्रतीक्षा कायम आहे. निसर्गाने भंडारा जिल्ह्याला भरभरून सर्वकाही दिल्यावरही शेतकरी व आम आदमी विकासाच्या कोसो दूर जात आहे. पैशाअभावी शेतकरी सावकाराच्या दारात उभा आहे. पीक कर्जाची रक्कम केव्हाच उचल करून खर्च सुद्धा झाली आहे. रोवणी व अन्य कामे पैशाविना करायची कशी हा प्रश्न बळीराजाला सतावत आहे. पालांदूर आधारभूत केंद्राअंतर्गत गोडाऊन अभावाने किटाडी येथे धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. २५ जूनपर्यंत ८४ शेतकऱ्यांनी धान विक्री केली असून ३४७१.६० क्विंटल धानाची खरेदी आटोपली आहे. ६०६ शेतकऱ्यांनी उन्हाळी धान विक्रीकरिता शासकीय ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली आहे. ३० जून ही शेवटची मोजणीची तारीख आहे. जुलै महिना मोजणीकरिता अत्यावश्यक आहे. बारदाना अभावाने धान खरेदी प्रभावित आहे. एक महिन्याची धान खरेदीला मुदतवाढ आवश्यक असल्याचे पालांदूरचे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे यांनी सांगितले.
कोट
बारदाण्याची व्यवस्था अगदी दोन दिवसांत केली जाईल. मागणी केली असून बारदाण्याचे ट्रक पोहोचताच केंद्रावर सोडले जातील.
गणेश खर्चे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी भंडारा.