पावसात धान पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 05:00 AM2020-10-08T05:00:00+5:302020-10-08T05:00:27+5:30
बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून कापणीला आलेले धान पीक उद्ध्वस्त केले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट झाले आहे. तर कापलेले कडपे ओले झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा या पावसाने घात केला.
बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.
लाखनी तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला. पालांदूर, खराशी, खुनारी, डोंगरगाव, मुरमाडी, जेवनाळा, मचारणा, कवलेवाडा, मेंगापूर आदीसह अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला. पवनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हस्ती नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. उभे पीक आडवे झाले असून कडपा ओल्या झाल्या आहे. सर्वाधिक फटका चौरास भागातील आसगाव परिसराला बसला आहे.
तुमसर तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सायंकाळीसुद्धा पाऊस बरसत होता. तालुक्यातील पवनारा, सिहोरा, चुल्हाड यासह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.
मोहाडी तालुक्यात सायंकाळी ४ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेत. लाखांदूर आणि साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
कापणी झालेला धान वाचविण्याची धडपड
जिल्ह्यात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. गत तीन चार दिवसांपासून कापणीला वेग आला. मात्र बुधवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतात कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. कडपा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड चालविल्याचे चित्र दिसत होते. मात्र पाऊस जोरदार असल्याने कडपा वाचविण्याची उसंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.
शेतकऱ्यांवर संकटाची मालिका
धान उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा संकटाची मालिका दिसत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने धान पीक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांनी यासंकटावर मात केली तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा शेकडो हेक्टर धान पिकाला फटका बसला. यातून सावरत नाही तोच आता बुधवारी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातचा घास हिसकावून नेला.