धानपिके नष्ट; हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतात सोडली जनावरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 11:24 AM2024-10-18T11:24:01+5:302024-10-18T11:24:51+5:30

दांडेगाव शेतशिवारातील घटना : दोन महिने लोटूनही मदत नाही

paddy crops destroyed; The desperate farmer left the animals in the field | धानपिके नष्ट; हतबल झालेल्या शेतकऱ्याने शेतात सोडली जनावरे

paddy crops destroyed; The desperate farmer left the animals in the field

दयाल भोवते 
लोकमत न्यूज नेटवर्क 
लाखांदूर :
पहिल्यांदा आलेल्या पुराने लागवडीखालील धान पन्हे सडले. अन्य शेतकऱ्यांकडून पन्ह्यांची जुळवाजुळव करून धान पिकाची लागवड केली. मात्र, दुसऱ्यांदा आलेल्या पुराने तेही धान पीक नष्ट झाल्याने व शासनाकडून कुठलीही मदत न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने उभ्या धान पिकात जनावरे चारण्यासाठी सोडले. हा प्रकार लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव शेतशिवारात उघडकीस आला आहे. कुंडलिक चेपटू घाटे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 


कुंडलिक यांची दांडेगाव शेतशिवारात नदीकाठावर अडीच एकर शेती आहे. खरीप हंगामात धान पिकाची लागवड करण्यासाठी कुंडलिकने पह्यांची लागवड केली होती. पन्हे लागवडीसाठी आल्यानंतर काही दिवसांत पन्ह्यांची शेतात लागवड करणार तोच पहिल्यांदा अतिवृष्टीने झोडपून काढले. चुलबंद नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. पुरामुळे कुंडलिकच्या शेतातील संपूर्ण धान पन्हे पाण्याखाली येऊन सडले.


पूर ओसरताच कुंडलिकने परिसरातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या धान पन्ह्यांची जुळवाजुळव करून पुन्हा धान पिकाची लागवड केली. धान पिकाचे संगोपन करताना त्याने खते व विविध औषधांची फवारणी केली. चुलबंद नदीला आलेले पुराचे पाणी कुंडलिकच्या शेतात शिरल्याने धान पिकाचे पूर्णतः नुकसान झाले.


महसूल प्रशासनांतर्गत नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली. मात्र, तब्बल २ महिने लोटूनही कुठलीही नुकसानभरपाई न मिळाल्याने संतापलेल्या कुंडलिकने धान पिकांत गावातील शेतकऱ्यांची जनावरे चराईसाठी सोडली. कुंडलिक, त्याची पत्नी व २ मुले असा चौघांचे कुटुंब आहे. घराचा संपूर्ण आर्थिक रहाटगाडा शेतीवर अवलंबून आहे. शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.


मदत मिळणार तरी केव्हा
अतिवृष्टीनंतर पंचनामे करण्यात आले. पुरानंतरही तोच प्रकार पुन्हा घडला. दोनवेळा अस्मानी संकट आल्याने मदत मिळेलच, अशी आशा शेतकऱ्याला होती. मात्र दोन महिने लोटूनही मदत काही मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याला टोकाचे पाऊल उचलावे लागते. अशीच अवस्था तालुक्यातील अन्य शेतकऱ्यांचीही आहे.

Web Title: paddy crops destroyed; The desperate farmer left the animals in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.