साहेब, बदाबदा पावसानं आता धान सडू लागले हो.. शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 05:37 PM2022-07-25T17:37:33+5:302022-07-25T17:39:07+5:30

पालांदूर परिसरातील बांध्यांना तलावाचे स्वरूप

paddy destroyed due to heavy rain, farmers facing lakhs of crop loss | साहेब, बदाबदा पावसानं आता धान सडू लागले हो.. शेतकऱ्यांचा टाहो

साहेब, बदाबदा पावसानं आता धान सडू लागले हो.. शेतकऱ्यांचा टाहो

Next

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : पंधरा दिवस झाले साहेब, पावसानं दम घेतला नाही. जास्तीच्या पाण्यानं धान सडू लागले आहे. काय करावं अन् काय नाही हे सुचेनासं झालं आहे. दुबार पेरणी व रोवणीला पैसा कुठून आणावा, याचंच आता टेन्शन आलं. ही व्यथा आहे लाखनी तालुक्यातील चूलबंद खोऱ्यांतील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची!

गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. धानाच्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले असून, रोवणी झालेले धान पिवळे पडून सड्डू लागले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करतात; मात्र आता सारखा पाऊस कोसळत आहे. पालांदूर मंडळात सरासरी १२१ टक्के पाऊस झाला. पंधरा एकराची कास्तकारी करणारे ढिवरखेडाचे प्रशांत खागर सांगत होते, पाच एकरात धान रोवणी पूर्ण झाली; मात्र पावसाने रोवणी शक्य होत नाही.

रावणी झालेले पाच एकरातील धान सडण्याच्या मार्गावर आहे. नर्सरीतील पऱ्हे पावसाने उद्ध्वस्त होत आहेत. आता पाऊस थांबला की सर्वप्रथम पऱ्ह्यांची तजवीज करावी लागणा आहे. नाही तर शेती पडीक ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत होते घोडेझरी शिवारात शेत असलेले गजानन हटवार. आनंदराव हटवार म्हणाले, रोवणी झालेल्या धानाला खताची मात्राही देता आली नाही. तणनाशक फवारून उपयोग नाही. बांध्यांत गवत वाढत आहे. पाऊस असाच राहिला तर संपूर्ण धान सडून जाईल. मऱ्हेगाव शिवारात शेत असलेले शेतकरी भगवान शेंडे, दामोधर फुंडे म्हणाले, आम्ही पीक विमा काढला आहे. त्याचा लाभ तरी शासनाने तत्काळ द्यावा.

रोवणी झालेल्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकरी बांध्या फोडून पाण्याचा निचरा करीत असल्याचे दृश्य दिसून आले. गजानन भुसारी म्हणाले, बांध्या फोडून पाण्याचा निचरा केला तरी वरून पाऊस कोसळतच आहे. काही उपयोग होत नाही. आतापर्यंत अतिवृष्टीने ८ ते १० हजार रुपये पाण्यात गेले. पुढेही पीक हाती येण्याची शाश्वती नाही.

Web Title: paddy destroyed due to heavy rain, farmers facing lakhs of crop loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.