हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 09:52 PM2018-10-11T21:52:25+5:302018-10-11T21:52:50+5:30

Paddy is harvested on thousands of hectares | हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

हजारो हेक्टरवरील धान पीक करपले

Next
ठळक मुद्देबळीराजावर अस्मानी संकट : सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा

इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हाडामासाच्या जिवांना पोसणाऱ्या बळीराजावर पुन्हा अस्मानी संकट कोसळले आहे. जिल्ह्यातील शेकडो हेक्टर धान पीक एका पाण्याअभावी करपले आहे. धाना ऐवजी घरी तणस घेवून जायचे काय? असा संतप्त सवाल बळीराजाने विचारला असून प्रशासन मात्र सर्व आॅलवेल असल्याचे सांगत आहे.
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धान पीकाची लागवड केली जाते. धानपीकासाठी जमीनाचा पोत उत्तम असल्यामुळे वर्षाकाठी खरीप व रब्बी हंगामात पीक शेतकरी घेत असतो. परंतु या धान पीकाची खरी मदार पावसावर असते. यावर्षी मृग नक्षत्रापासून पाऊस दमदार बरसला असला तरी हलके धान गर्भात असताना एका पाण्याअभावी धान पीक वाळत चालले आहे. दुसरीकडे धान पीक वाचविण्याच्या प्रयत्नात शेतकरी सिंचनाच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकत आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी मोहाडी व भंडारा तालुक्यात चक्क आंदोलन छेडण्यात आले आहे.
धान पिकत नसेल तर जगावे तरी कसे? असा संतप्त व तेवढाच मनाला उद्वीग्न करणारा प्रश्न बळीराजा विचारीत आहेत. जिल्ह्यातील मध्यम तथा अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा असतांना सिंचनासाठी दिले जात नाही. दुसरीकडे पेंच प्रकल्प विभागासोबत करार करुनही टेलपर्यंत पाणी न पोहोचल्याने बळीराजा हताश झाला आहे.
चौरास भागात काही ठिकाणी धान पिकाच्या मळणीला प्रांरभ झाला असला तरी काही ठिकाणी स्थिती हादरुन टाकणारी आहे. यात सर्वात जास्त टेंशन अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोली व लाखनी परिसरात धान पीकासाठी एका पाण्याची गरज आहे. मात्र यास्थितीत पाणी मिळूनही त्याचा उपयोग राहणार नाही असेही शेतकरी बोलून दाखवित आहे. एकंदरीत यावर्षीही शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे.
प्रशासन म्हणते सर्व आलबेल
धानपीकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी विविध संघटना व लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वात आंदोलन उभारले आहे. पाणी जेव्हा येईल तेव्हापर्यंत धान पीक हातचे जाणार अशी भिती असताना जिल्हा प्रशासन मात्र आलबेल असल्याचे सांगत आहे. या संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत आलेल्या पीक पेरणी अहवालात धानाचे उत्पादन चांगले येईल, असे दिसून येते.

पाण्याअभावी धानपीक वाळत आहे, अशा आशयाची कुठलीही वार्ता किंवा माहिती आमच्या कार्यालयापर्यंत अधिकृतपणे आलेली नाही. हलके धान येत्या काही दिवसात निघणार आहे. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल असे काही चिन्ह दिसून येत नाही.
-हिंदूराव चव्हाण,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Paddy is harvested on thousands of hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.