५०० एकरातील धानपीक काळवंडले
By admin | Published: October 5, 2016 12:35 AM2016-10-05T00:35:56+5:302016-10-05T00:35:56+5:30
अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला.
पाऊस नाही, धान नाही : भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील प्रकार
भंडारा : अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसेल या आशेपोटी शेतकऱ्यांनी धानपीकाची पेरणी केली. पाऊसही बरसला. पऱ्हयांची स्थिती चांगली असताना रोवणीच्या हंगामात पावसाने पाठ फिरविली. परिणामी धारगार जिल्हा परिषद क्षेत्रातील जवळपास ५०० एकरातील धानपिक पावसाअभावी काळवंडले आहेत. यामुळे बळीराजाचा जीव मेटाकुटीला आला असून पिकाच्या सर्वेक्षणाची मागणी आहे.
भंडारा जिल्ह्यात पावणे दोन लक्ष हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड केली जाते. यात भंडारा तालुक्यातही धानाची लागवड करण्यात आली. यातील चांदोरी मालीपार, कोकणागढ, डव्वा, सितापूर (गांगलेवाडा), गुंथारा, खुर्शिपार, वाघबोडी, माडगी (टेकेपार), पिंपळगाव, पलाडी, आमगाव (दिघोरी), शिंगोरी, राजेगाव (एमआयडीसी) आदी क्षेत्रातील धानपिक पाण्याअभावी संकटात सापडले. मान्सुन हंगामात जिल्ह्यात पावसाची टक्केवारी ७२ असली तरी पावसाचा लहरीपणा कायम राहिला. भंडारा तालुक्यात पावसाची सरासरी टक्केवारी ७२ इतकी आहे. परंतु पाऊस कुठे बरसला अन् कुठे नाही, अशी स्थिती निर्माण झाली. सुरूवाती पासून ते परतीच्या हंगामापर्यंत पावसाने हजेरी लावली असली तरी धारगाव क्षेत्रात वरूणराजाची अवकृपा झाली. या पट्यात अपेक्षेप्रापाणे पाऊस बरसला नाही. आज येईल, उद्या बरसेल, या आशेवर या परिसरातील शेतकऱ्यांनी धानपिक कसेतरी जिंवत ठेवले. मात्र ‘पावसाने’ या क्षेत्राला दोन हात दुरच ठेवले. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे, अशा शेतकऱ्यांनी रोवणी पूर्ण केली; परंतु जिथे शेती पूर्णत: पावसावर अवलंबून होती तिथे बळीराजा पावसाच्या हजेरीवर विंसबून होता. पाऊस न बरसल्याने रोवणी होऊ शकली नाही. जिथे रोवणी झाली पण सिंचनाअभावी पीक वाढू शकले नाही. अशा उपरोक्त नमूद केलेल्या जवळपास गावांमधील जवळपास ५०० एकरातील धानपीक कालवंडले आहे. (प्रतिनिधी)
तुडतुडा, करपा रोग कायम : सर्वेक्षण नाही
धानपिक गर्भावस्थेत असताना तुडतुडा, करपा, काणी, लष्करी अळी आदी किड व रोगाने आक्रमण केले. परिणामी धानावर पुन्हा संकट कोसळले. महागडी औषध करून शेतकऱ्यांनी फवारणी केली. पावसाचा दगा कायम राहिल्याने हातात आलेले पिकही वाया जाणार आहे. अशा स्थितीत नासाडी झालेल्या धानपिक क्षेत्राचे सर्वेक्षण करून सबंधित शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी भंडारा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश हुमणे यांनी केली आहे. दरवर्षी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असलेल्या बळीराजा अविरत संघर्षातून धानपिक घेण्याचा प्रयत्न करतो, मात्र शासनस्तरावर योग्य वेळी मदत दिली जात नाही.
चांदोरीसह परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस बरसला नाही. शेकडो हेक्टर जमीन पडीत राहणार आहे. शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना तातडीने मदत करणे गरजेचे आहे. तरच शेतकऱ्यांना थोडीफात मदत मिळू शकेल.
- राजपती खराबे, अध्यक्ष, तंटामुक्त गाव समिती, चांदोरी.
तुडतुडा, करपा, लष्करी अळी या रोगाने हातात आलेले पिक संकटात आले आहे. दुसरीकडे परतीच्या पावसाने या क्षेत्रावर कृपादृष्टी घातली नाही. डोळयासमोर हातात आलेले धानपिक कालवंडले असून आर्थिक कोंडी वाढली आहे.
- सिताराम बंसोड,
शेतकरी चांदोरी.