‘नांगर, वखर सोडा राया, मज बंधू नेवा आले, धाडता का नाई’; लोकगीतांच्या तालावर धान रोवणीला आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 08:25 PM2022-07-20T20:25:39+5:302022-07-20T20:26:23+5:30
Bhandara News भंडारा जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील किटाडी व परिसरात दमदार पावसाच्या साथीने शेतशिवारात सर्वत्र भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे.
भंडारा: लाखनी तालुक्यातील किटाडी व परिसरात दमदार पावसाच्या साथीने शेतशिवारात सर्वत्र भात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. शेतात रोवणी करताना पारंपरिक लोकगीते म्हणायची पद्धत फार पूर्वीपासूनची आहे. लोकगीतांच्या माध्यमातून मजूर महिलांना एक प्रकारे स्फूर्ती व ऊर्जा मिळते. गाणी म्हणत महिला रोवणीच्या कामात तल्लीन होऊन जातात. शेतशिवारात फेरफटका मारल्यास लोकगीतांचे सूर कानी पडतात.
‘नांगर, वखर सोडा राया, मज बंधू नेवा आले, धाडता का नाई’ अशा प्रकारे लोकगीतातून माहेरी जाण्यासाठी आपल्या पतीची मनधरणी करीत असते. अशी अनेक लोकगीते प्रसिद्ध आहेत. रोवणी संपणे हा शेतकरी व मजूर वर्गासाठी आनंदाचा सोहळा असतो. रोवणीच्या शेवटच्या दिवशी सर्व मजुरांना सकाळपासूनच सायंकाळच्या घुगऱ्यांची प्रसंगी जेवणाची आठवण येते. पूर्वीच्या काळी व आजच्या आधुनिक युगात फार तफावत आहे. मात्र, परंपरा न विसरता रोवणी रोवताना कथा, चुटकुले व लोकगीतांचे सादरीकरण करण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही कायम असल्याचे दिसते.
धार्मिक गाणी, राजा-राणीच्या पौराणिक कथा, चुटकुले सादरीकरणातून रोवणीला बहर चढवित असतात. पारंपरिक लोकगीते ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. प्रौढ व म्हाताऱ्या महिला पारंपरिक लोकगीते आपल्या तालासुरात गातात. शेती कामाचा अनुभव यावा, यासाठी तरुणीही रोवणीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, तरुणी पारंपरिक लोकगीतांऐवजी हास्याचे फवारे उडविणारी चुटकुले, नव्या पिढीची हिंदी व मराठी चित्रपटाची गाणी म्हणत रोवणी उरकण्यात व्यस्त असल्याचे दिसते.
पहाटेपासूनच लगबग
बळीराजा व मजुरांच्या घरी अगदी पहाटेपासूनच उठून घर कामांची आवरावर करणे, स्वयंपाक करणे, शिदोरीचा डबा भरणे अशी कसरत महिला मजुरांना करावी लागते. रोवताना पावसापासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक कागद सोबत न्यावे लागते. दुपारी शिदोरीच्या डब्यातून आणलेल्या जेवणातील चविष्ट भाज्या एकमेकींना देत जेवण करीत रोवणीचा उत्साह द्विगुणीत केला जातो.