बारदान्याअभावी आधारभूत केंद्रावरील धान खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:24 AM2021-01-01T04:24:11+5:302021-01-01T04:24:11+5:30
लाखांदूर : शासनाच्या किमान आधारभूत किमत धान खरेदी योजनेंतर्गत तालुक्यात अस्तित्वातील अर्ध्याहून अधिक आधारभूत केंद्रांवर, बारदान्याअभावी धान खरेदी ठप्प ...
लाखांदूर : शासनाच्या किमान आधारभूत किमत धान खरेदी योजनेंतर्गत तालुक्यात अस्तित्वातील अर्ध्याहून अधिक आधारभूत केंद्रांवर, बारदान्याअभावी धान खरेदी ठप्प झाली आहे.
लाखांदूर तालुक्यात विजयलक्ष्मी राईस मिल सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था व पंचशील भातगिरणी सहकारी संस्थेंतर्गत यंदाच्या खरीपात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सदर केंद्रांतर्गत तालुक्यात नियमित शेतकऱ्यांच्या धानाची आधारभूत किमतीने खरेदीदेखील केली जात आहे. मात्र खरेदी केंद्र सुरू होऊन दीड महिनाही लोटत नाही तोच तालुक्यातील अनेक केंद्रांवर बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने अर्ध्याहून अधिक केंद्रांवरील खरेदी बंद पडली आहे.
दरम्यान, यंदाच्या खरीपात पूर, तुडतुडा व परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट झाल्याने अधिकतम शेतकरी आधारभूत केंद्रांतर्गत उपलब्ध किंमत व बोनसचा लाभ घेण्यासाठी या केंद्रावर धानाची विक्री करताना दिसत आहेत. मात्र केंद्रावर धान विक्री करताना शासनाकडून धान खरेदीसाठी आवश्यक बारदान्याचा साठा उपलब्ध करण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सध्या बारदान्याअभावी तालुक्यातील भागडी, डोकेसरांडी, पारडी, पिंपळगाव यासह अन्य अर्ध्याहून अधिक खरेदी केंद्र बंद पडले असल्याची ओरड आहे.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन धान खरेदी पूर्ववत होण्यासाठी पर्याप्त बारदान्याचा पुरवठा करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.