बारदान्याअभावी खुटसावरी येथील धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:17+5:302021-06-21T04:23:17+5:30
धान खरेदी केंद्र बंद होण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. गत काही दिवसांपासून बारदान नसल्याने धान खरेदी केंद्र बंद ...
धान खरेदी केंद्र बंद होण्याची शेवटची तारीख ३० जून आहे. गत काही दिवसांपासून बारदान नसल्याने धान खरेदी केंद्र बंद आहे. खरीपमध्येही शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाईन होऊनही धान खरेदी केंद्रावर धान घेण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात खुल्या बाजारात धान विकावे लागले. तेव्हाही शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. राज्य शासनाकडून खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा करण्यात आली; मात्र पाच महिने होऊनही राज्य शासनाने अद्यापही बोनसची रक्कम अदा केली नाही. तसेच उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू केले; पण त्या ठिकाणी धान विकण्यासाठी सतराशे विघ्न येत आहेत.
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर धानाचे पीक हाती येऊनही केंद्र सरकारच्या धोरणानुसार मे महिन्याच्या सुरुवातीला सर्व धान खरेदी केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे खरीप हंगामाची सुरुवात होऊन पावसाळ्याची सुरुवात होत असताना उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. मात्र, राज्य शासनाने केंद्र बंद करण्याची मुदत कमी देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा अफलातून प्रकार केला. अन्न, नागरी पुरवठा व जिल्हा पणन विभाग यांनी तत्काळ खुटसावरी येथील धान खरेदी केंद्रावर बारादान पाठवून धान खरेदी सुरू करावी, अशी मागणी खुटसावरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.