२४ पासून सुरू होणार आधारभूत धान खरेदी केंद्र
By admin | Published: October 22, 2016 12:23 AM2016-10-22T00:23:44+5:302016-10-22T00:23:44+5:30
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाकडून किमान आधारभूत धान खरेदी योजना राबविण्यात येते.
शासनाचा निर्णय : शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
साकोली : शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाकडून किमान आधारभूत धान खरेदी योजना राबविण्यात येते. यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थामार्फत राज्यात एफ.ए.क्यू. दर्जाच्या धान व भरड धान्याची खरेदी करण्यात येते. त्यामुळे केंद्र शासनाने धान या धान्यासाठी राज्यात विकेंद्रीत खरेदी योजना लागू करणेबाबत केलेली शिफारस विचारात घेऊन २०१६-१७ पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
यासाठी मागील काही दिवसांपासून साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी संबंधित खात्याचे मंत्री व सचिवांशी संपर्क साधून धान खरेदी केंद्र सुरू करण्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे आदेश निर्गमित करण्यात आले. सदर शासन निर्णयात खरीप हंगामातील धान खरेदीचा कालावधी २४ आॅक्टोबर ते ३१ मार्च २०१७ असून रबी उन्हाळी धान खरेदीचा कालावधी १ मे ते ३० जून पर्यंत ठरविण्यात आला आहे. याशिवाय भरड धान्यातील मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा कालावधी १ नोव्हेंबर ते ३१ मार्च असा ठरविण्यात आला आहे.
खरेदी केलेल्या धान्याची देय रक्कम शेतकऱ्यांना अदा करताना खरेदीची पुर्ण रक्कम शक्यतो ई-पेमेंटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल आणि शेतकऱ्यांचे बँकेमध्ये खाते नसल्यास अथवा अपवादात्मक परिस्थितीत देय रक्कम धनादेशाद्वारे अदा करण्यात येणार येईल. त्यामुळे खाते उघडण्याकरीता सहकार्य करावे, असे आवाहन आमदार बाळा काशिवार यांनी शेतकऱ्यांना केले आहे. (तालुका प्रतिनिधी)