धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:36+5:30
भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने आधारभूत किमतीत धान खरेदीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात मंजूर ६७ केंद्रांपैकी ६६ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत धानाची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७६ शेतकऱ्यांनी २ लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर एकच गर्दी केली असून दररोज शेकडो क्विंटल धानाची विक्री होत आहे. मात्र गत महिनाभरात विकलेल्या धानाचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. दुसरीकडे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून खरेदीच्या संथ गतीने दहा ते पंधरा दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने आधारभूत किमतीत धान खरेदीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात मंजूर ६७ केंद्रांपैकी ६६ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत धानाची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७६ शेतकऱ्यांनी २ लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे. धान विक्रीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टीवीटी राहत नसल्याने शहर गाठून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. ठरलेल्या दिवशी खरेदी केंद्रावर धान घेऊन शेतकरी पोहचले. परंतु तेथे धान ठेवायलाच जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना आपला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे.
धान खरेदी केंद्रावर अतिशय संथ गतीने मोजणी केली जात आहे. बहुतांश धान खरेदी केंद्रावर एकच काटा असल्याने मोजणीची अडचण निर्माण होते. तसेच अपुऱ्या बारदान्यामुळेही खरेदी प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी पालांदूर केंद्रावर झाली असून तेथे १३ हजार ६८० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. परंतु आता तेथे बारदान्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात तेथील खरेदी थांबविण्याची वेळ सेवा सोसायटीवर येणार आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील इतरही आधारभूत धान खरेदी केंद्राची आहे.
धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. शेतकºयांना मुक्काम करावा लागला तर उघड्यावरच मुक्काम करण्याची वेळ येते. रात्री थंडीत कुडकुडत आपल्या धानाचे रक्षण करावे लागते. गतवर्षीच्या गोदामाचे भाडे थकीत असल्याने नवीन गोदाम मिळविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे खरेदी केलेला धानसाठा करण्याचा प्रश्न फेडरेशनपुढे आहे. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने धान उत्पादक शेतकरी वाºयावर आहेत.
विधानसभा अध्यक्षांकडून शेतकऱ्यांना अपेक्षा
शेतकरी नेते आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची प्रचंड जाण असलेले साकोलीचे आमदार नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून धान उत्पादकांच्या समस्या ते निश्चितच सोडवतील अशी अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.
हुंड्या पाठविल्या पण पैैसेच नाहीत
भंडारा जिल्ह्यात २३ नोव्हेंबर पर्यंत खरेदी केलेल्या धानाच्या हुंड्या मुंबई येथील कार्यालयात आल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पैसेच आले नाहीत. पैशाला विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातील पूर्ण धान आधारभूत किमतीत विकले. परंतु आता पैशासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे.
अधिकारी नसल्याने चुकाऱ्यास विलंब
संपूर्ण धान खरेदीचे नियंत्रण असलेले भंडारा येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सध्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाली दिसत आहे. येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची ८ नोव्हेंबरला बदली करण्यात आली. त्यानंतर नवीन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली. परंतु ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबरनंतर खरेदी केलेल्या धानाच्या हुंड्या पाठविणे अत्यंत अडचणीचे जात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसत आहे.