जिल्ह्यात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2022 09:28 PM2022-11-17T21:28:37+5:302022-11-17T21:29:01+5:30
अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेंतर्गत २३३ केंद्रांना मंजुरी दिली असली तरी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी बहुतांश सर्वच केंद्रांवरील मान्यता रखडली होती. आता १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने या केंद्रांना खरेदीची मान्यता देण्यात आली आहे. असे असले तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात केवळ १५ केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेचा शुभारंभ झाला. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीच सुरू आहे. त्यातच अनेक केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे त्यांना आयडी देण्यात आली नव्हती. अनियमितता करणाऱ्या केंद्रांना ५० हजार ते एक लाखापर्यंत दंडही ठोठावला होता. त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी संथ गतीने सुरू आहे. २३३ पैकी १२२ केंद्रांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांना खरेदीची मंजुरी प्रदान करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात अद्यापही वेगाने धान खरेदी सुरू झाली नाही. जिल्ह्यातील केवळ १५ केंद्रांवर खरेदी सुरू आहे. त्यातही सर्वाधिक केंद्र पवनी तालुक्यातील आहेत.
भंडारा तालुक्यात १७ खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून ५६ शेतकऱ्यांनी २३४७ क्विंटल धानाची विक्री केली आहे. लाखनी तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी ५६ क्विंटल तर लाखांदूर तालुक्यात २६ शेतकऱ्यांनी ८८७ क्विंटल आणि पवनी तालुक्यातील १५५ शेतकऱ्यांनी ६३०३ क्विंटल धान पणन महासंघाला विकला आहे. विशेष म्हणजे मोहाडी, तुमसर आणि साकोली तालुक्यात अद्याप एक क्विंटलही धानाची खरेदी झाली नाही. अद्याप खरेदी केंद्र सुरूच झाले नसल्याने शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचण येत आहे. तर अनेक शेतकऱ्यांची अद्यापही ऑनलाईन नोंदणी झाली नाही. ३० नोव्हेंबरनंतर धान खरेदीला वेग येईल, असे पणन महासंघाच्यावतीने सांगण्यात आले.
२३९ शेतकऱ्यांनी विकला धान
- जिल्ह्यातील प्रत्यक्ष सुरू झालेल्या १५ केंद्रांवर आतापर्यंत केवळ २३९ शेतकऱ्यांनी धान विकला आहे. नऊ हजार ५९४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. ऑनलाइन नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत असून आतापर्यंत ८१ हजार ९९६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. तर १५० शेतकऱ्यांनी नोंदणीचा ॲप डाऊनलोड केला आहे. दोन लाख २३ हजार शेतकरी नोंदणीकृत असून अद्यापही सुमारे दीड लाख शेतकऱ्यांची नोंदणी बाकी आहे. दोन आठवड्यांत नोंदणी करण्याचे दिव्य शेतकऱ्यांना पार पाडावे लागणार आहे.
शेतकरी धान खरेदी केंद्रांच्या शोधात
- पणन महासंघाने धान खरेदीसाठी १२२ केंद्रांना परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात केवळ १५ केंद्र सुरू झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना धान विकताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी आपल्या परिसरातील धान खरेदी केंद्र सुरू झाले काय, याचा शोध घेत आहे. केंद्र सुरू न झाल्याने व्यापाऱ्यांना धान विकावा लागत आहे.