जागेअभावी धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:37 PM2017-12-10T22:37:59+5:302017-12-10T22:38:16+5:30
येथील शासकीय आधारभूत धान खरेदी उपकेंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल भरल्यामुळे आणि या खरेदी केंद्राला अद्याप पुरवठा आदेश डीओ प्राप्त न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून धान खरेदी केंद्र बंद आहे.
आॅनलाईन लोकमत
विरली (बु.) : येथील शासकीय आधारभूत धान खरेदी उपकेंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल भरल्यामुळे आणि या खरेदी केंद्राला अद्याप पुरवठा आदेश डीओ प्राप्त न झाल्याने गेल्या १५ दिवसांपासून धान खरेदी केंद्र बंद आहे. परिणामी शेकडो पोती धान खरेदी केंद्रात उघड्यावर पडून आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले असून मळणी केलेला आता कुठे विकायचा, असा विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
येथील विविध कार्यकारी सेवा सह. संस्थेच्या गोदामात दि पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्या वतीने आधारभूत धान खरेदी उपकेंद्र सुरू करण्यात आले.
या खरेदी केंद्रावर ६० शेतकºयांच्या २ हजार २७ क्विंटल ६० किलो धानाची खरेदी बंद करण्यात आली.
या खरेदी केंद्राला पुरवठा आदेश न मिळाल्यामुळे येथे खरेदी झालेल्या धानाची उचल झालेली नाही. त्यामुळे धान ठेवण्यासाठी गोदामात जागाच नसल्याने नाईलाजाने धान खरेदी बंद करावी लागल्याचे केंद्रचालक हरिभाऊ नरूले यांनी सांगितले.
धान खरेदी बंद झाल्याने या खरेदी केंद्राच्या पटांगणात शेकडो पोती धान उघड्यावर पडून असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या खरेदी केंद्राची एजंट दि पंचशील सहकारी धान गिरणीचे अध्यक्ष हरगोविंद नखाते यांनी खासगी गोदामाचा शोध घेतला. मात्र त्यांना त्यात यश आले नाही.
सध्या धान मळणीचा हंगाम जोमात सुरू आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे मळणी केलेला धान विकायचा कुठे, असा संतप्त शेतकºयांचा सवाल आहे. या प्रकारामुळे परिसरातील खासगी व्यापाºयांची चांदी असून शेतकरी नाईलाजाने कमी दरात या व्यापाºयांना धान विकत आहेत.
या केंद्राला डी.ओ. देऊन गोदाम खाली कराचा किंवा एखाद्या खासगी गोदामाची व्यवस्था करून तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. शर्थीचे प्रयत्न करीत धान ठेवण्यासाठी खासगी गोदाम मिळण्यास विलंब होत आहे. गोदाम मिळाल्यानंतर लगेच धान खरेदी केंद्र सुरू होईल.
खरेदी केंद्राच्या एजंट संस्थेला ८ डिसेंबरपर्यंत गोदाम शोधण्याची डेडलाइन दिली आहे. लवकरच गोदामाची व्यवस्था होईल आणि धान खरेदी पुर्ववत सुरू होईल.
- गणेश खर्चे,
जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.