धान खरेदी केंद्र सुरु होताच पडले बंद
By admin | Published: November 30, 2015 12:44 AM2015-11-30T00:44:49+5:302015-11-30T00:44:49+5:30
आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे.
अपुऱ्या बारदाण्याचा शेतकऱ्यांना फटका : तीन दिवसातच गोदाम झाले फुल्ल
तुमसर : आधारभुत धान खरेदी केंद्रावर धानाची आवक वाढल्याने गोदामही भरल्यामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ संचालकावर आली आहे. दुसरीकडे ज्या गोदामामध्ये जागा शिल्लक असतानाही आधारभूत केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कुठे अपुरा तर कुठे सडलेला बारदाणा पाठविला. त्यामुळे धान खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांनी यापुढे धान आणू नये, अशा आशयाचा फलक केंद्राच्या प्रवेशद्वारावर लावलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांची धान विक्रीकरिता परवड होत आहे.
तुमसर तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील धानाची मळणी झाली आहे. आधारभूत केंद्र दिवाळी पुर्वी सुरु होणार अशी आशा होती. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडल्याने दिवाळी सारखा सण डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्यांना काहीसा धान खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी किमतीत विकला होता. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची आर्थिक कुचंबणा थांबवी आणि आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी झाली. दरम्यान, दिवाळीनंतर आधारभुत केंद्रावर बारदाणा पडला व खरेदी सुरु होताच हमीभाव केंद्रावर अक्षरश: धानाची आवक वाढली. त्यामुळे आधारभूत केंद्र संचालकानी शेतकऱ्यांचे धान घेऊन त्यांना टोकन देण्यात आले. परंतु टोकण दिलेल्या धानाची मोजणी व्हायची असल्यानेही हमीभाव केंद्रावर धान अस्ताव्यस्त पडून पडलेला दिसत आहे. परिणामी धान केंद्रावर येणाऱ्या नविन शेतकऱ्यांच्या धानासाठी जागाच शिल्लक नसल्याने त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील नाकाडोंगरी येथिल विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रावरील गोदाम फुल्ल झाले असून शेतकऱ्यांना टोकन मिळालेला धान अजूनही गोदामाबाहेर असून नाकाडोंगरी, हिरापूर, राजापूर, गुढरी, खंडाळ, धामनेवाडा, चिखला, सिरपूर, हमेशा, हिरापूर व सोदेपूर आदी ठिकाणावरून मिळेल त्या साधनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रीकरिता आणतच आहेत.
आधारभूत केंद्राच्या संचालकाने गोदामाच्या दर्शनी भागात शेतकऱ्यांचा सूचना लिहून यापुढे धान विक्रीकरिता हमीभाव केंद्रावर आणू नये असे गोडावूनच्या दर्शनी भागात लिहून खरेदी बंद केली आहे. तर कुठे हमीभाव केंद्रावर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अपुरा बारदाणा तर कुठे सडका बारदाणा पाठविल्याने ते ही आधारभूत केंद्र बंदच असल्याने शेतकऱ्यांनी आपले धान विकावे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा किसान गर्जना संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)