धान घोटाळा; कृषकच्या माजी व्यवस्थापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 12:24 PM2023-04-21T12:24:11+5:302023-04-21T12:24:53+5:30

सीआयडीची कारवाई : प्रकरण साडेबारा कोटीच्या धान घोटाळ्याचे, आरोपीची कारागृहात रवानगी

paddy scam; Krishak's former manager arrested | धान घोटाळा; कृषकच्या माजी व्यवस्थापकाला अटक

धान घोटाळा; कृषकच्या माजी व्यवस्थापकाला अटक

googlenewsNext

राहुल भुतांगे

तुमसर (भंडारा) : भंडारा जिल्ह्यातील सहा राइस मिलमधील साडेबारा कोटी रुपयांच्या धान खरेदी अपहार प्रकरणात तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचाही समावेश होता. याप्रकरणी कृषक सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन व्यवस्थापक आणि विद्यमान सरपंच शैलेंद्र फंदी यांना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या घोटाळ्यात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या तीनवर गेली आहे.

तत्कालीन निलंबित जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांनी २०१८ मध्ये याप्रकरणी सीआयडीकडे तक्रार केली होती. त्यानंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात हा प्रकार उघड झाला होता. तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेला २०११-१२ मध्ये आधारभूत धान खरेदी केंद्र मिळाले होते. या केंद्रावरून सुमारे दीड कोटी रुपयांची अफरातफर झाली होती. भरडाईसाठी जिल्ह्यातील सहा राइस मिलकडे धान दिल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते.

भरडाईनंतर तांदूळ शासनाकडे परत न करता खोटी बिले जोडून शेतकऱ्यांच्या नावे रकमेची उचल करण्यात आली होती. हा घोटाळा एकूण १२.५० कोटी रुपयांचा आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर काही राइस मिल चालकांनी ८.५० कोटी रुपयांचे धान शासनाकडे जमा केल्याचे तपासात आढळून आले. यात मोहाडी तालुक्यातील सहा राइस मिलचा समावेश आहे.

याप्रकरणी २०११ मध्ये कार्यरत असलेले तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी अशोक शहारे आणि तुमसर येथील कृषक सेवा सहकारी संस्थेचे तत्कालीन संचालक आणि माजी अध्यक्ष धनराज चौधरी (मांढळ) यांना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली होती. त्यांना जामीन सुद्धा मिळाला आहे. याच प्रकरणात तुमसर कृषक सेवा सहकारी संस्थेचे माजी व्यवस्थापक तथा मेहगावचे (ता. तुमसर) विद्यमान सरपंच शैलेंद्र फंदी हे दोषी आढळल्याने त्यांना सीआयडीने घरून अटक केली. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. फंदी यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे.

या धान घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे असून येरली, नाकाडोंगरी, आंबागड, वाहनी, बपेरा या संस्थांवर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. माँ शारदा व संकल्प या दोन संस्थांना कोर्टाने दोन महिन्यांची मुदत दिल्याने कार्यवाही थांबली होती. आता त्यांचा कालावधी संपला असून पुढील कारवाई करू.

- अजय बिसने, प्रभारी जिल्हा पणन अधिकारी, भंडारा.

Web Title: paddy scam; Krishak's former manager arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.