बारदाण्याअभावी धान खरेदी केंद्र बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:35 AM2021-01-03T04:35:21+5:302021-01-03T04:35:21+5:30
चौरास भागात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. धान कापणीचा हंगाम संपला असून धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. सुरुवातीलाच ...
चौरास भागात मोठ्या प्रमाणात धानपीक घेतले जाते. धान कापणीचा हंगाम संपला असून धान मळणीचे काम वेगात सुरू आहे. सुरुवातीलाच धान खरेदी केंद्र सुमारे एक महिना उशिरा सुरू झाले. अशातच आता अल्पावधीतच बारदाणा संपला. उद्या गोदाम भरणार आणि नंतर काहीतरी वेगळेच घडणार अशी ही नेहमीचीच साडेसाती शेतकऱ्यांच्या मागे लागलेली असते. यासाठी सक्षमपणे यंत्रणा उभी केली तर शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. मात्र, यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे .
विरली (बु.) येथील रूपचंद चुटे व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांच्या गोदामात दी पंचशील सहकारी धान गिरणी मासळच्यावतीने आधारभूत धान खरेदी उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राअंतर्गत विरली (बु.), ईटान, विरली (खुर्द) अशी तीन गावे येत आहेत. या केंद्रावर आतापर्यंत १० हजार ७८८ क्विंटल ४० किलो धान खरेदी करण्यात आले. मात्र, गेल्या ८-१० दिवसांपासून या केंद्रावरील बारदाणा संपल्यामुळे धान खरेदी बंद आहे.
धान खरेदी बंद असल्याने केंद्राच्या आवारात शेकडो पोती धान उघड्यावरच पडून आहे. पर्यायाने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. सुरुवातीलाच केंद्राच्यावतीने आवारात धान ठेवण्यासाठी मनाई करण्यात आली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कळविण्यात आल्यानंतरच शेतकऱ्यांनी विक्रीसाठी धान आणावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या, असे केंद्रचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आवारात असलेल्या धान्याच्या पोत्यांचा वाली कोण ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
केंद्रचालकांकडून वारंवार मागणी करूनही या केंद्रावर जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून येथे बारदाण्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. तरी या केंद्रावर तातडीने बारदाण्याचा पुरवठा करून खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
कोट
विरली येथील धान खरेदी केंद्रावर अगदी एक-दोन दिवसांत बारदाणा उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्हा पणन अधिकाऱ्यांकडून पुरेशा प्रमाणात बारदाणा उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे आम्हांला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो.
- हरगोविंद नखाते, अध्यक्ष, दी पंचशील सहकारी धान गिरणी, मासळ