जेवणाळा येथे धान खरेदी केंद्र १४ दिवसापासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:45+5:302021-01-08T05:55:45+5:30
नोव्हेंबर महिन्यापासून भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू होते. आधीच धान खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या ...
नोव्हेंबर महिन्यापासून भंडारा जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू होते. आधीच धान खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले. जिल्हा मार्केटिंग कार्यालयाच्या दुर्लक्षित धोरणामुळे धान खरेदी केंद्र ठप्प. कित्येक धान खरेदी केंद्रात बारदाना, गोदामाचा अभाव आहे. त्यामुळे धान खरेदी ठप्प पडलेली आहे. जेवणाळा येथील अरविंद हेमने, पुरुषोत्तम हेमने, केदार गिरेपुंजे ,निखिल बोरकर, देवीदास हेमने, हेमा भुते, हेमंत हेमने, रमेश गिरेपुंजे, श्यामराव गिरेपुंजे आदींनी प्रशासनाला आधारभूत धान खरेदी केंद्राची समस्यांची माहिती दिली.
२२ डिसेंबरपर्यंत धान खरेदी सुरू होती. त्यानंतर गोदाम भरल्याने खरेदी बंद पडलेली आहे. मोजणीच्या प्रतीक्षेत शेतकरी ताटकळत आहे. ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज शेतकऱ्यांना भरणे अनिवार्य आहे. धानाची विक्री तत्पूर्वी होऊन चुकारे मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
व्यापाऱ्याचा ट्रक कारवाईची प्रतीक्षा
जेवणाळा येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर २३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी परराज्यातील धानाचा ट्रक पकडला होता. १४ दिवस लोटूनही ट्रक पालांदूर पोलीस ठाण्यात कारवाईच्या प्रतीक्षेत उभा आहे. प्रशासन धानाच्या व्यापारावर किंवा ट्रक चालकावर काय कारवाई करतो, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
कोट
जेवणाळा येतील धान खरेदी केंद्र संपूर्णता भरल्याने खरेदी करणे जागेअभावी कठीण आहे. जोपर्यंत धानाचा डिओ मिलर्सना मिळत नाही तो पर्यंत गोदाम रिकामे होणार नाही आणि धान मोजणी शक्य नाही. जागेअभावी धान खरेदी बंद आहे.
अनिल गोंधोळे
अध्यक्ष सेवा सहकारी संस्था जेवणाळा.
जेवणाळा येथे २२ डिसेंबरपर्यंत १२ हजार ५५९ क्विंटल धानाची मोजणी आटोपलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अपडेट माहिती जिल्हा मार्केटिंग कार्यालयाला दिलेली आहे. गोदाम फुल्ल झाल्याने धान खरेदी बंद आहे.
पप्पू कानतोडे
ग्रेडर जेवणाळा.