पालांदूर परिसरात रोवणीचा धडाक्यात श्रीगणेशा
By admin | Published: July 3, 2017 12:44 AM2017-07-03T00:44:40+5:302017-07-03T00:44:40+5:30
मृग नक्षत्रात हलक्या पावसाच्या साथीने उगवलेले पऱ्हे आता रोवणीला आले आहे. पालांदूर व परिसरात सिंचन क्षेत्रासोबतच
शेतकऱ्यांत लगबग : मजुरांची मजुरी शंभर रूपयांवर, समाधानकारक पावसाने दिली साथ
मुखरू बागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर (चौ.) : मृग नक्षत्रात हलक्या पावसाच्या साथीने उगवलेले पऱ्हे आता रोवणीला आले आहे. पालांदूर व परिसरात सिंचन क्षेत्रासोबतच कोरडवाहू शेतकऱ्यांनी सुद्धा रोवणीला प्रारंभ केला आहे. पालांदूर परिसरात मागील महिन्यात २६४.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून पावसाची जोमदार हजेरी लावल्याने शेतशिवारात पाणी साचले असून नर्सरी अथवा पऱ्हे जोदार दिसत असून उत्तम वाढीला लागले आहेत.
एक दोन शेतकऱ्यांनी रोवणीला आरंभ केला असे नाही तर एकाचवेळी अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. पावसाने जर अशीच साथ दिली, तर नक्कीच १५ दिवसात संपूर्ण रोवणी पूर्णत्वाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पालांदूर व परिसर दरवर्षीच रोवणीला म्हणा किंवा शेती मशागतीत अग्रक्रमावर नसते. निसर्गाच्या साथीने शेतकरी रात्रंदिवस काळ्या मातीत खपत असून अधिक उत्पन्नाकरिता प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
मंडळ कृषी कार्यालय पालांदूर शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देत अत्याधुनिक मार्गदर्शनाने शेती कसण्याचे आव्हान करीत आहेत. कृषीचे पदविधर विद्यार्थी, कृषी केंद्रधारकही शेतकऱ्यांना उचित मार्गदर्शन करीत असल्याने पालांदूरचा शेतकरी पुढे जात आहे. खताच्या मात्रेत डीएपी व संमीश्र खते वापरात वाढ झाली आहे.
सुमारे ३० टक्क्यांवर शेतकऱ्यांनी हायब्रिड धानाची लागवड केली आहे. प्रगतशील शेतकऱ्यात टिकाराम भुसारी, सुनिल थेर, मोरेश्वर खंडाईत, टिकाराम नंदनवार, सतीश हटवार, प्रमोद हटवार, माणिक इखार, दयाराम कावळे आदी शेतकऱ्यांनी रिमझीम पावसाच्या साक्षीने रोवणीचा श्रीगणेशा केला आहे. पऱ्हे केवळ १२ दिवसाचे असताना सुद्धा रोवणीला आरंभ केला आहे.
यामुळे फुटवे अधिक येवून उत्पन्न वाढीला मदत होणार आहे. कृषी केंद्रातही अपेक्षित रासायनिक खते उपलब्ध झाली आहेत. मजुरांच्याही हाताला काम मिळाल्याने व हवामान पावसाळ्याचा वाटत असल्याने मन प्रसन्न वाटत शेतशिवार प्रफुल्लीत वाटत आहे. निळेभोर आकाश व मंद शितल वारा, अधून मधून पावसाच्या सरी सुरु असल्याने शेतकरी सुखावला आहे.
रविवार असल्याने विद्यार्थीवर्ग सुद्धा शेतात रोवणीच्या कामाला हातभार लावत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. बाहेरगावातील मजूर पालांदूरात ट्रॅक्टरने दाखल झाले आहेत. त्याला बैलांच्या (ट्रॅक्टर) सहाय्याने शेती कामाला मोठी गती मिळाली आहे.