पालांदूर- मऱ्हेगाव - बारव्हा राज्य मार्ग घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:48+5:302021-05-14T04:34:48+5:30
: लाखनी तालुक्यातील पालांदूर - मऱ्हेगाव - बारव्हा हा नऊ किलोमीटरचा रस्ता राज्य मार्ग म्हणून घोषित करण्यात आला ...
: लाखनी तालुक्यातील पालांदूर - मऱ्हेगाव - बारव्हा हा नऊ किलोमीटरचा रस्ता राज्य मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे. अडगळीत पडलेला रस्ता दुरुस्त होऊन या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी प्रयत्न केले हे विशेष!
पालांदूर - मऱ्हेगाव - बारव्हा हा रस्ता राज्यमार्ग झाल्याने थेट चंद्रपूर, नागपूर असा रस्ता कमी अंतराचा ४ जिल्ह्यांना जोडणारा होणार आहे. या नऊ किलोमीटरच्या रस्त्यावर १६ कोटी रुपयांचा पूल मंजूर झालेला आहे. लवकरच काम सुद्धा सुरू होणार आहे. चुलबंद खोऱ्यातील अनेक गावांना या रस्त्याने व पुलाने विकासाची नवी संधी मिळणार आहे. चुलबंद खोऱ्यातील भाजीपाला थेट चार जिल्ह्यांच्या ग्राहकांना मिळण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.
कित्येक वर्षापासूनची या परिसरातील नागरिकांची असलेली मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पूर्ण केली.
लाखांदूर व लाखनी तालुका यांना जोडणारा थेट रस्ता राज्यमार्गाच्या रूपाने तयार होणार आहे. लाखांदूर तालुक्यातील जनतेला थेट जिल्ह्यात प्रवास करताना कमी वेळेत सहज शक्य झाले आहे. चुलबंद नदीवरील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू होण्याचे संकेत अभियंता मटाले यांनी दिलेले आहे. आधी पूल नंतर रस्ता असे कामाचा नियोजन आहे. ग्रामीण भागातील चिखलमय रस्त्याला थेट राज्यमार्ग बनविल्याने आम्हाला आता सोयीचे होणार असल्याचे मऱ्हेगावचे सरपंच देवकर्ण बेंदवार यांनी सांगितले.