४० वर्षांतही पालांदूर कोरडाच ! सिंचनाकरिता पाणी देण्याची शेतकऱ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 16:44 IST2025-04-09T16:41:06+5:302025-04-09T16:44:23+5:30
Bhandara : कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन

Palandur remains dry even after 40 years! Farmers demand water for irrigation
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : बहुप्रतीक्षित गोसेखुर्द धरणाचे पाणी पालांदूर परिसरात पोहोचले. मात्र, मायनरचे काम न झाल्याने पालांदूर चाळीस वर्षातही कोरडाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. ही खदखद पालांदूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकारी अभियंता अंकुश कापसे अंबाडी यांच्या दरबारात व्यक्त केली. ज्येष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच लता कापसे, उपसरपंच पंकज रामटेके, जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत, जि.प.चे माजी उपाध्यक्ष तु रा. भुसारी यांच्या पुढाकारात निवेदन देण्यात आले.
पालांदूर वितरिकेचे काम मेंगापूरपर्यंत येऊन ठेपले आहे. परंतु, त्यानंतरच्या उपनलिकांचे टेंडर होऊनसुद्धा कंत्राटदाराने काम केले नाही. २०१९-२०२१ पासून ई-टेंडरिंग होऊनसुद्धा कामाचा पत्ता नसल्याने पालांदूर कोरडा आहे. निवेदन देताना माजी सरपंच हेमराज कापसे, तंमुस अध्यक्ष अरविंद मस्के, सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर कापसे, ग्रामपंचायत सदस्य मंगला भुसारी, हर्षा राऊत, शेतकरी अंतू खंडाईत उपस्थित होते. मागणी पूर्ण झाल्यास कवडसी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसातील होणारा त्रास यामुळे कमी होणार आहे.
खुनारी, खराशी परिसरात मन्हेगाव पुच्च कालव्याद्वारे पाणी सुरू आहे. रोवणीसुद्धा आटोपली आहे. शेतापर्यंत कुंड्या पोहोचल्या; मात्र त्यात पाणीच येत नसल्याने सिंचन बंद आहे. ही व्यथा खुनारीचे सरपंच गंगाधर शेलोकर, माजी सरपंच हेमंत शेलोकर यांच्यासह १० लोकांचे शिष्टमंडळ पालांदूरच्या शिष्टमंडळासोबत आले. त्यांचीसुद्धा व्यथा मांडली. अभियंत्यांशी बोलून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न कार्यकारी अभियंता अंकुश कापसे यांनी केला.
विभागीय स्तरावर चर्चेचे आमंत्रण...
सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ अंबाडी येथे पोहोचले. सकारात्मक चर्चा पार पडली. चर्चेअंती विदर्भपाटबंधारे सिंचन विभाग नागपूर येते विभागीय संचालक सोनटक्के यांच्या दालनात कार्यकारी अभियंता यांच्या सोबतीने चर्चेकरिता निमंत्रण मिळाले आहे.
टेलिंगचे काम होणार
पालांदूर वितरिकेपासून पुढे नाल्यापर्यंत टेलिंग (सांडवा) चे काम येत्या आठवड्यात सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किमान या कामामुळे तरी नाल्याला पाणी सोडण्याचे नियोजन करता येईल.
निविदा रद्दच्या प्रक्रियेत...
गोंदिया येथील दोन कंपनीला पालांदूरच्या मायनरचे काम ई-टेंडरिंगद्वारे झाले होते. मात्र, त्यांनी गत सहा वर्षांपासून कामाला आरंभच केला नाही. त्यामुळे त्यांची निविदा प्रक्रियेकरिता विभागीय स्तरावर प्रस्तावित आहे.