पालांदूर जि.प. व ग्रा.पं.ची पोटनिवडणूक शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:46 AM2019-06-24T00:46:01+5:302019-06-24T00:46:23+5:30
पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : पालांदूर जिल्हा परिषद व सरपंचासह दोन ग्रामपंचायत सदस्यांची निवडणूक रविवारला शांततेत पार पडली. कार्यकर्त्यांचा उत्साह व ढगाळ वातावरणात दिवसभर मतदान केंद्रावर तोबा गर्दी होती. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसह मजूर वर्ग मोकळे असल्याने मतदानाची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. जिल्हा परिषद पालांदूर येथील चार बुथची सरासरी मतदान ६८.२० टक्के झाले, ग्रामपंचायतचे ७६ टक्के मतदान झाले.
सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्रावर मतदारांनी उत्साही वातावरणात मतदानाला आरंभ केला. मात्र प्रभाग पाचच्या यादीतील एक पान नसल्याने थोडावेळ गोंधळ उडाला. प्रशासनाच्या लक्षात येताच चुकीने सुटलेले पान अगदी कमी वेळात लावून मतदारांना मतदानाकरिता उपलब्ध करून देण्यात आले. ग्रामपंचायत सरपंच व दोन सदस्यांच्या निवडणुकीत प्रमाणपत्रानुसार मतदान याद्या सुरळीत होत्या. मात्र जिल्हा परिषदच्या मतदानाकरिता प्रभागानुसार मतदारांची यादी नसल्याने एका केंद्रावरून दुसºया केंद्रावर जाण्याची वेळ मतदारांवर आली. काही मतदारांना तर जिल्हा परिषदचा मतदान क्रमांकच मिळत नसल्याने निराशेपोटी उगीचच कटकट म्हणून मतदानाचे काम टाळले. हा प्रकार जिल्हा परिषद हायस्कुल येथे बुथ क्रमांक चार व पाचवर घडला. मतदान क्रमांक व बुथ क्रमांक शोधताना उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागला.
पालांदुरचे तलाठी बावनकर व मंडळ अधिकारी पंधरे यांनी यशस्विपणे मतदान केंद्रावर काम पाहिले. ठाणेदार अंबादास सुनगार यांनी आपल्या ताफ्यासह चोख बंदोबस्तात मतदान केंद्रावर सेवा पुरविली.
जिल्हा परिषद क्षेत्रात २३ बुथवर अगदी शांततेत व उत्साहात मतदान पार पडले. शक्यतो एकाच शाळेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायतचे मतदान केंद्र ठेवले असते तर मतदारांना मतदानाकरिता अडचणी झाल्या नसत्या, असा सूर उमेदवारांनी व पुढाऱ्यांनी व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत दिव्यागांना खुर्चीची सोय केली होती. ती सोय आज नसल्याने दिव्यांगांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागला.
मतमोजणी सोमवारला तहसील कार्यालय लाखनी येथे सकाळी १० वाजता सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजतापर्यंत संपूर्ण निकाल अपेक्षित आहे. पालांदूर जिल्हा परिषद क्षेत्राची निवडणूक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची केली आहे. मतमोजणीत कुणाचे पारडे जड ठरणार आहे, याकडे आता लक्ष लागले आहे.