सिरसाळात फुलला पिवळा पळस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 09:25 PM2019-03-16T21:25:47+5:302019-03-16T21:26:03+5:30
वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत.
लक्ष्मीकांत तागडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : वसंत ऋतूची सुरुवात होताच सगळीकडे फुलझाडांचा बहर आलेला आहे. त्यातही सगळीकडे पळसांच्या झाडांवर केशरी रंगाची बहरदार फुले आली आहेत. त्यामुळे या पळसांच्या फुलांनी जंगलाचे सौंदर्य खुलविले आहे. पण सिरसाळा गावाजवळ असणाऱ्या पळसाच्या झाडाला पिवळे फुले आली आहेत. त्यामुळे या पिवळ्या फुलाच्या पळसाने जंगलाचे सौंदर्य अजूनच खुलविले आहे. केशरी फुलांच्या पळसात या पिवळ्या फुलांनी आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.
पवनीपासून सात किमी अंतरावर जंगलाला लागून सिरसाळा गावाजवळ शालू एकनाथ मेश्राम यांची दीड एकर शेती आहे. रस्त्याला लागूनच त्यांचे शेत आहे. वसंत ऋतूची सुरुवात झाल्यामुळे केशरी रंगाचे पळसाचे फुले सर्वत्र फुलले आहेत. सगळीकडे त्यामुळे आनंदमय वातावरण पसरले आहे. मात्र शालू मेश्राम यांच्या शेतात फुललेल्या पिवळ्या रंगाच्या पळसाच्या फुलांनी जंगलाच्या सौंदर्यात भर घातली आहे.
या परिसरात या पिवळ्या रंगाच्या फुलाचे पळसाचे एकच झाड आहे. त्यामुळे हे पिवळ्या रंगाचे झाड पाहण्याकरिता अनेक लोक येत आहेत.
शालू मेश्राम यांचे पती नवेगावबांध वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी असलेले एकनाथ मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी हे शेत घेतले तेव्हापासून पिवळ्या पळसाचे झाड होते. या फुलांना औषधी गुणधर्म असून उन्हाळ्यात उन्ह लागली तेव्हा या पिवळ्या फुलांचा काढा बनवून अथवा शरबत बनवून दिले जाते. तसेच हाता-पायांनाही या फुलांचा रस लावला जातो. त्यामुळे उन्ह कमी होते. अनेक नागरिक या पिवळ्या फुलांची मागणी करतात. या पिवळ्या पळसाचे फुले पाहण्याकरिता रोज लोक शेताला भेट देत आहेत.