पालोरात ७०० मजुरांना मिळाला रोहयोचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 05:00 AM2020-05-28T05:00:00+5:302020-05-28T05:01:00+5:30
कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद्यासाठी शहराकडे धावपळ सुरू झाली. यावर्षी कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : लॉकडाऊन २३ मार्चपासून सुरु झाल्यानंतर मजूर व बेरोजगारांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. पालोरा येथील तळहातावर पोट भरणाऱ्यांचे आर्थिक संकट उभे ठाकले होते. अखेर पालोरा ग्रामपंचायतीने पुढाकार घेत शासन, प्रशासनाचे माध्यमातून गावात तलाव खोलीकरण, मजगी व शेत पुनरुज्जीवनाचे काम हाती घेण्यात आले. रोहयोच्या माध्यमातून सुमारे ७०० मजुरांना संकटकाळात मोलाचा आधार मिळाला.
कोरडवाहू करडी परिसरात खरीप हंगामात मुख्यत: धानाचे पीक घेतले जाते. यामुळे शेतमजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. कोका वन्यजीव अभयारण्याच्या निर्माणापासून जंगलावर आधारित व्यवसायांवर कडक निर्बंध लागले. त्यामुळे खरीप हंगामानंतर मजुरांची कामधंद्यासाठी शहराकडे धावपळ सुरू झाली. यावर्षी कोरोना संसर्ग उद्भवल्याने मजुरांचे हाल झाले. अनेकांनी शहरातून खेड्याकडे पलायन केले. खेड्यात बेरोजगारांची मोठी फौज उभी ठाकली आहे.
गावात रोजगाराची वानवा असताना आर्थिक नाकेबंदी होत गेली. पालोरा येथे दोन महिन्यांपासून मजुरांकडे रोजगार नव्हता. अखेर सरपंच महादेव बुरडे यांचे पुढाकारात रोहयो कामांचे नियोजन करण्यात आले. विविध विभागाच्या कामांचे नियोजन मंजुरीसाठी पाठविण्यात आले.
अखेर कृषी विभागाचे मदतीने शेतीच्या पुनरुज्जीवनाचे तर पंचायत समितीमार्फत मजगीचे काम सुरू करण्यात आले. दोन्ही कामावर जवळपास १०० मजुरांना रोजगार मिळाला.
शेवटी जास्तीत जास्त मजुरांना रोजगार मिळावा या हेतूने ग्रामपंचायतीमार्फत पाटील तलाव खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. सदर कामावर सुमारे ६२५ मजुरांना काम मिळाले.