पाणंद रस्ता कामावर बोगस मजुरांसह स्वयंपाकी महिला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 01:08 PM2024-07-29T13:08:59+5:302024-07-29T13:10:14+5:30

रोजगार सेवक दोषी: दहा मजुरांचे बोगस नाव; खैरलांजी येथील प्रकरण

Panand Road Women cooks with bogus laborers at work | पाणंद रस्ता कामावर बोगस मजुरांसह स्वयंपाकी महिला

Panand Road Women cooks with bogus laborers at work

लोकमत न्यूज नेटवर्क 
चुल्हाड (सिहोरा):
खैरलांजी येथील पाणंद रस्त्याच्या अकुशल कामावर बोगस मजुरांसह जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिलेचे नाव रोजगार सेवकाने रोहयोच्या कामावर घातले. चौकशी अधिकाऱ्याच्या चौकशीत हा गैरप्रकार निष्पन्न झाला. रोजगार सेवकाने शासकीय निधीचा दुरुपयोग केल्याचे चौकशीत आढळून आल्यानंतर चौकशी अहवालात रोजगार सेवकाला दोषी ठरविण्यात आले आहे. एप्रिलपासून गाजत असलेल्या प्रकरणात तब्बल ३ महिन्यांनंतर तक्रारकर्त्यांना न्याय मिळाला आहे. हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले होते.


खैरलांजी गावातील निगम डायरे ते सूरज पारधी यांच्या घरापर्यंतच्या रोहयो अकुशल कामावर १२० मजूर कामावर होते. यात १० मजूर बोगस असल्याची माहिती मिळताच उपसरपंच नवनीत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य शिशुकला ठाकरे, प्रेमलता तिवाडे, वीणा मते, देवकन पारधी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली होती. रोजगार सेवक बोगस मजुरांची नावे नोंदवून शासकीय निधी लाटत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी खंडविकास अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर उपसरपंच आणि सदस्यांसोबत रोजगार सेवकाने भांडण केले. शिवीगाळ केली. याप्रकरणी तुमसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. 


गावात बोगस मजुरांच्या नावावर रोजगार सेवकाने निधी लाटल्याचा प्रकार चर्चेत आल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. १८ लाख ८ हजार ८७३ रुपये खर्चाच्या पाणंद रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. बोगस मजूर प्रकरण तापत असताना खंडविकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. ८ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत कामाची चौकशी करण्यात आली. ग्रामपंचायतच्या सभागृहात १ जुलैला १० बोगस मजुरांना समितीने चौकशीसाठी पत्र दिले. परंतु, ९ बोगस मजूर चौकशी समितीच्या समोर गैरहजर होते. एक मजूर उपस्थित झाला. मजुराचे नाव ऐकून समिती सदस्यांच्या भुवया उंचावल्या. बोगस मजुरांच्या यादीत १० क्रमांकावर जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या स्वयंपाकी महिलेचे नाव होते. दुर्गा रवी मते या महिलेचे नाव आल्याने त्यांनाही धक्काच बसला.


रोजगार सेवक टेकचंद जीवन डाकरे यांच्याविरोधात समितीने दोषी असल्याचा अहवाल दिला आहे. दरम्यान, हे बोगस मजुरांचे प्रकरण 'लोकमत'ने लावून धरले. उपसरपंचासह ग्रामपंचायतच्या सदस्यांना तब्बल तीन महिन्यांचे नंतर न्याय मिळाला आहे.


पाठबळ दिल्यास आमरण उपोषण
चौकशी अहवालात रोजगार सेवक दोषी आहे. परंतु, निलंबनाची कारवाई केली जात नसल्याने अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. पाठबळ देण्यासाठी पळवाट शोधली जात आहे. राजकीय दबाव वाढविला जात आहे. खैरलांजी बोगस मजूर प्रकरणात दोषी आढळून आलेल्या रोजगार सेवकाला पाठबळ दिल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंचांसह सदस्यांनी दिली आहे.

Web Title: Panand Road Women cooks with bogus laborers at work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.