पंचायत समिती सभापती निवडणूक : भंडाऱ्यात काॅंग्रेसचे दाेन, तर राष्ट्रवादीने गाेंदियात खाते उघडले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2022 10:26 AM2022-05-07T10:26:13+5:302022-05-07T10:32:31+5:30
नाना पटाेले यांच्या भंडारा जिल्ह्यात काॅंग्रेसला २, तर प्रफुल्ल पटेल यांच्या गाेंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला खाते उघडता आले नाही. त्यामानाने गाेंदियात भाजपने पाच पंचायत समितींवर एकहाती सत्ता मिळविली
भंडारा/गोंदिया : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृहजिल्हा भंडारा आणि राष्ट्रवादीचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांचा गृहजिल्हा गाेंदियामध्ये शुक्रवारी पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. दिग्गज नेत्यांच्या जिल्ह्यात हाेत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले हाेते. मात्र अपेक्षेप्रमाणे तेथील काैल त्या नेत्यांच्या विराेधातच गेला.
नाना पटाेले यांच्या भंडारा जिल्ह्यात काॅंग्रेसला २, तर प्रफुल्ल पटेल यांच्या गाेंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसला खाते उघडता आले नाही. त्यामानाने गाेंदियात भाजपने पाच पंचायत समितींवर एकहाती सत्ता मिळविली. एकूण १५ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या खात्यात ६, राष्ट्रवादीकडे ४, काॅंग्रेसकडे ३, विनाेद अग्रवाल यांच्या चाबीकडे एक आणि वंचितनेही एका पंचायत समितीवर खाते उघडले.
भंडारा जिल्ह्यात चार पंचायत समितींवर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे सभापती, दाेन पं.स.वर काँग्रेसचे, तर एका पंचायत समितीवर भाजपच्या उमेदवाराने विजय मिळविला. उपसभापतिपदावर भाजपचे तीन, काँग्रेसचे दोन, राष्ट्रवादीचे एक आणि शिवसेनेने एका जागी विजय प्राप्त केला.
गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समितींपैकी आमगाव, गोरेगाव, तिरोडा, सडक अर्जुनी आणि देवरी या पंचायत समित्यांत भाजपला बहुमत असल्याने त्यांच्या पक्षाचे सभापती आणि उपसभापती निवडून आले; तर सालेकसा पंचायत समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत भाजपकडे बहुमत असतानाही सभापती आणि उपसभापतिपदी आपल्या पक्षाच्या सदस्यांची वर्णी लावता आली नाही; तर वंचित आणि अपक्ष सदस्याला पाठिंबा देण्याची वेळ आली. त्यामुळे त्यांना येथे सत्तेबाहेर राहावे लागले; तर महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या गोंदिया पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने आमदार विनोद अग्रवाल यांच्या जनता की पार्टी (चाबी) आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापन झाली. सभापतिपदी चाबीच्या, तर उपसभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची वर्णी लागली. विशेष म्हणजे या पंचायत समितीत दोन अपक्ष आणि बसपाच्या एका सदस्याने चाबीला समर्थन दिले. जिल्ह्यातील आठपैकी पाच पंचायत समित्यांवर भाजपला एकहाती सत्ता स्थापन करता आली.
१५ पंचायत समित्यांवरील प्रशासक राज संपले
भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांवरील प्रशासक राज सभापतींच्या निवडीने संपुष्टात आले. मुदत संपल्याने भंडारा जिल्ह्यातील सात व गोंदिया जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांमध्ये जुलै २०२० मध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना संसर्ग वाढल्याने निवडणूक घेता आली नाही. अखेर दोन टप्प्यात निवडणूक होऊन १९ जानेवारी रोजी निकाल घोषित झाला आणि तीन महिन्यांनंतर सत्ता स्थापण्यात आली.