बळजबरीने बनविला शेतातून पांदण रस्ता
By Admin | Published: June 7, 2017 12:29 AM2017-06-07T00:29:11+5:302017-06-07T00:29:11+5:30
चिचखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून बनविण्यात येत असलेला पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून बळजबरीने तयार करण्यात येत असून ...
चिचखेडा येथील प्रकार : अभियंता व रोजगार सेवकावर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : चिचखेडा ग्रामपंचायत अंतर्गत रोजगार हमी योजनेतून बनविण्यात येत असलेला पांदण रस्ता हा शेतकऱ्यांच्या शेतातून बळजबरीने तयार करण्यात येत असून काही शेतकऱ्यांची परवानगी सुद्धा घेण्यात आली नाही. त्यामुळे रोहयो अभियंता निनावे व रोजगार सेवक नरेश बोंदरे यांच्यावर शासनाच्या पैशाचा अपव्यय केल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणी अन्यायग्रस्त शेतकरी भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी केली आहे. दोन वर्षापूर्वी याच रस्त्याचे काम दाखवून पैसे लाटण्यात आले होते, हे विशेष.
चिचखेडा येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याचे काम सुरु आहे. ज्या ठिकाणी आमरस्ता आहे, त्या रस्त्याला मातीकाम व मुरुमकाम करून पक्का रस्ता बनविण्यात येतो. मात्र खासगी रस्त्याला किंवा खासगी कामे सध्या रोहयो मधून केल्या जात नाही. तसेच त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांची सहमती घेणे सुद्धा अनिवार्य असते. मात्र भैय्या सेलोकर ते मिताराम दमाहे यांच्या शेतापर्यंत तयार करण्यात येत असलेला रस्ता शेतकऱ्यांच्या जागेतून असल्याने तसेच काही शेतकऱ्यांच्या सोयीसाठी इतर शेतकऱ्यांच्या शेतातून हा रस्ता तयार करण्यात येत होता. यावर काही शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी आपली शेतजमीन देण्यास नकार दिली. तरी बळजबरीने या रस्त्याचे काम सुरु करण्यात आले.
भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी या कामाला विरोध केला व रस्त्याचे काम बंद पाडले. त्यामुळे या दोघांची मोहाडी पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली. शेतकऱ्यांचे आक्षेप असताना यंत्रणेने हे काम रोहयोद्वारे करण्यामागे मोठे षडयंत्र असल्याचे बोलले जात आहे.
काही विशिष्ट शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी इतर शेतकऱ्यांवर अन्याय करून व त्यांची शेतजमीन बळजबरीने हिसकावून त्यावर रस्ता तयार करण्यात येत आहे. भैय्या सेलोकर ते मिताराम दमाहे हा पांदन रस्ता काम त्वरीत बंद करण्यात यावे व रोहयो अभियंता निनावे व रोजगार सेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भैय्या सेलोकर व नाना सेलोकर यांनी केली आहे. याचे निवेदन त्यांनी मोहाडी तहसीलदार, खंडविकास अधिकारी यांना केली आहे. शासन या गंभीर प्रकरणावर काय भूमिका घेते व दोषींवर कारवाई करते का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सदर रस्ता हा वादात असल्याने त्याचे काम करण्यासाठी मी संमती दिली नाही. खंडविकास अधिकारी यांनी स्वत: त्या रस्त्याला मंजुरी दिली. शेतकऱ्यांचे आक्षेप असताना सुद्धा. सध्या त्या रस्त्याचे काम बंद आहे.
-परसराम गाढवे,
सरपंच, चिचखेडा.