पांगडी-लेडेंझरी परिसर जैवविविधतेची खाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 05:00 AM2020-05-22T05:00:00+5:302020-05-22T05:00:58+5:30
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराडी, धावडा, बीजा, हळद, शमी, बिबा व तेंदू यासह अनेक वनस्पती येथे आहेत. पहाडी टेकड्यांनी वेढलेल्या या रमनीय सौंदर्यात तलावाने अधिकच भर घातली आहे.
इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हिरवीगार वनश्री, वन्यजीव व वनसंपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पांगडी, लेंडेझरी हा राखीव जंगल जैविविधतेने संपन्न आहे. सातपुडा पर्वत रांगाच्या सौंदर्याने हा परिसर पर्यटकांनाही सातत्याने खुनावत असतो. मात्र नयनरम्यता असूनही फक्त निधीअभावी या परिसराचा विकास होऊ शकलेला नाही.
पांगडी, लेंडेझरी परिसरात असलेल्या परिसरात विस्तीर्ण तलाव आहे. यासोबतच वाघ, बिबट, सांबर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांसह मोर, हरिण, चितळ यासह असंख्य पशुपक्षांचे वास्तव्य आहे. जंगल क्षेत्रात आंजन, मोहा, आवळा, बाभूळ, हिरडा, बेहडा, शिशम, कडूनिंब, पळस, गराडी, धावडा, बीजा, हळद, शमी, बिबा व तेंदू यासह अनेक वनस्पती येथे आहेत. पहाडी टेकड्यांनी वेढलेल्या या रमनीय सौंदर्यात तलावाने अधिकच भर घातली आहे. यासोबतच बंदरझीरा, बघेडा, रामपूर, शिवनी इत्यादी रमनीय तलावाचा भूभाग म्हणूनही हे क्षत्र ओळखले जाते. जवळपास १२५ किमीचे क्षेत्र राखीव जंगल असून अभयारण्याकरिता उत्कृष्ट अशी निसर्गाने दिलेली देणगी आहे. त्यात पांगडी जलाशय हा पर्यटकांना नेहमी खुणावत असतो. लॉकडाऊन काळात पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात रोडावली.
गायमुख टेकडीवरुन या तलावाचे विहंगम दृष्य सर्वांनाच मोहीत करतो. या स्थळाचा विकास झाल्यास जैवविविधतेने नटलेल्या या क्षेत्रात पर्यटक व वन्यप्रेमीची वर्दळ पहायला मिळू शकते. मिटेवानी, चिचोली, नाकाडोंगरी व चिचोली फाट्यावरुन बघेडा, रोंधा, मंगर्ली मार्गे नागपूर जिल्ह्यातही जाता येते. विविधतेने समृध्द व संपन्न असलेल्या या क्षेत्रात जैवविविधता पार्क असणे गरजेचे आहे.
इच्छाशक्ती पण निधीचा अभाव
सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या गायमुख, चांदपूर, गायखुरी, डोंगरमाला या परिसरात नानाविध पशु, पक्षी, प्राणी व समृध्द वनसंपदा आहे. जैविक विविधतेने नटलेल्या हा परिसर इच्छाशक्ती व निधीअभावी विकासापासून कोसो दूर आहे.
नैनीताल म्हणून नावारुपास आलेल्या तुमसर तालुक्यातील पांगडी लेंडेझरी परिसरासोबतच गर्रा, बघेडा, आसलपाणी, रामपूर, गायमुख, कवलेवाडा, आष्टी, लोभी, धुटेरा, आलेसुर, देवनारा, डोंगरली आदी क्षेत्रांचाही विकास होणे अपेक्षीत आहे.
तुमसर तालुका वगळता जैवविविधतेसाठी अड्याळपासून दहा किमी अंतरावर असलेल्या किटाडी तसेच कातुर्ली, तेलपेंढरी, भिवखिडकी, मांगली, सायगाव, बंदराझरी, तिर्री, खैरी, शेगाव या जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र राखीव जंगलात येतो.
जल, जंगल, जानवर, जमीन यांचे संरक्षण होणे अत्यंत महत्वाचे आहे. तरच सजीव सृष्टी तग धरु शकते. जैविविधतेने नटलेल्या तुमसर तालुक्यासह अन्य क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. राज्य शासनाने या बाबीकडे लक्ष देत सदर क्षेत्र संरक्षीत करुन पर्यावरण, वन्यजीव संरक्षणाचे काम करावे. जेणेकरुन त्यापासून मानवजातीलाही लाभ होईल.
-मो. सईद शेख,
पर्यावरण अभ्यासक, भंडारा
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील राखीव वनात भरपूर जंगल, वनस्पती, वन्यजीव, तलाव आहे. यात जैवविविधता समृध्द संपन्न आहे. कोसाचे उत्पादन होत असून नैसर्गिक बांबीवर भर देणे महत्वाचे आहे. आर्थिक उन्नती साधण्यासाठीही भर द्यावे.
- वसुंधरा फाळके
पर्यावरण कार्यकर्ता, भंडारा